मुंबई - कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा देशाची राजधानी मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झालेला असून, एप्रिल 2021 या महिन्यांमध्ये मुंबई शहरात दुप्पट गुन्हे वाढल्याचे समोर आले आहे.
मुंबईत घडलेले वेगवेगळे गुन्हे
मुंबई शहरात एप्रिल 2021 या महिन्यामध्ये 9037 गुन्ह्यांची नोंद झालेली असून, या दरम्यान मुंबई शहरातील 94 पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एप्रिल 2021 या महिन्यांमध्ये मुंबई शहरात तब्बल 7 खुनाचे गुन्हे घडले असून खुनाच्या प्रयत्नाचे 27 गुन्हे घडलेले आहेत. दरोड्याचा 1 गुन्हा मुंबई पोलिसांकडून नोंदविण्यात आलेला असून रॉबरी चे 44 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खंडणीचे तब्बल 12 गुन्हे नोंदविण्यात आले असून घरफोडीचे 95 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेले आहेत. चोरीचे तब्बल 258 गुन्हे घडले असून, वाहन चोरीचे 198 गुन्हे आतापर्यंत नोंदविण्यात आलेले आहेत. जखमी करण्याचे 321 गुन्हे , दंगलीचे 27, बलात्काराचे 66 विनयभंगाचे 138 गुन्हे व इतर आयपीसी प्रकरणातील 7843 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षात अधिक गुन्हे
मार्च 2021 या महिन्यांमध्ये मुंबई शहरात तब्बल 4007 इतके गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र एप्रिल महिन्यात याच गुन्ह्यांमध्ये वाढ होत 9037 गुन्ह्यांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 यादरम्यान देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात 19212 गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र हेच प्रमाण जानेवारी 2020 ते एप्रिल 2020 यावर्षी मुंबईत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या ही 16518 एवढी होती. एप्रिल 2021 या महिन्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या 9037 गुन्ह्यांपैकी 7927 गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे.
हेही वाचा - 'तौत्के चक्रीवादळ' आज मुंबईच्या समुद्री हद्दीत; मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा