मुंबई - मुंबईमध्ये गणेशोत्सव दहा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणादरम्यान गणपती बाप्पाला वाहिलेली फुले, हार, दुर्वा आदी निर्माल्य समुद्रात टाकले जात नाही. पर्यावरणाचा रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून हे निर्माल्य जमा करून त्यापासून खत बनवून ते पालिकेच्या उद्यानांमध्ये हे खत वापरले जाते. निर्माल्य पासून खत बनवले जात असल्याने बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या हार, फुले, दुर्वा आदी कचऱ्यात न टाकता त्याचा पालिकेकडून चांगला उपयोग केला जात आहे.
निर्माल्य केले जाते जमा - मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा करताना दीड ते दोन लाख बाप्पाच्या मुर्त्यांची स्थापना केली जाते. दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी या बाप्पाच्या मुर्त्या समुद्र तलाव आणि कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जातात. घरी आणि सार्वजनिक ठिकाणी स्थापना झालेल्या बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. या दरम्यान बाप्पाला फुले, हार, दुर्वा वाहिली जातात. विसर्जनाच्या दिवशी हे निर्माल्य विसर्जन ठिकाणी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशात जमा केले जाते.
दरवर्षी दोन लाख किलो निर्माल्य होते जमा - गणेशोत्सवादरम्यान गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा आदी चौपाटया आणि शिवडी जेट्टी, वेसावे जेट्टी, मढ-मार्वे जेट्टी, आरे कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शीतल तलाव), पवई तलाव, मुलुंड, भांडूप आदी ७३ विसर्जनस्थळी आणि तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जन करण्यात येते. मागील वर्षी २०२१ मध्ये २,६५,९८९ किलो निर्माल्य जमा केले होते. २०१९ मध्ये २ लाख ९९ हजार २७६ किलोग्रॅम इतके निर्माल्य संकलित करण्यात आले होते.
खताचा उपयोग पालिकेच्या उद्यानांमध्ये - बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा, फुले, हार इत्यादीं निर्माल्य कुत्रिम तलाव, नैसर्गिक विसर्जन स्थळे आदी ठिकाणी जमा केले जातात. त्यासाठी पालिकेकडून वाहने आणि कर्मचारी तैनात असतात. संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. या खताचा वापर महापालिकेच्या उद्यानांमध्ये केला जातो, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.