मुंबई - मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. काल (रविवारी १९ सप्टेंबर)रोजी अनंत चतुर्थीला सकाळी ११ च्या सुमारास गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. आज सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते. पहाटे ६ वाजेपर्यंत एकूण ३४, ४५२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १३, ४४२ मूर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान वर्सोवा येथे ५ मुले बुडाली. त्यापैकी २ जणांचा शोध लागला असून, ३ मुलांचा शोध अद्यापही घेतला जात आहे.
३४,४५२ गणेश मूर्तींचे विसर्जन -
मुंबईत आज पहाटे ६ वाजेपर्यंत ३४,४५२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ५०४३ सार्वजनिक, २९,०६० घरगुती आणि ३४९ गौरींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ३४, ४५२ मूर्त्यांपैकी १३, ४४२ मूर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक १८९०, घरगुती ११,३८७ तर १६५ गौरींचा समावेश होता. काल रविवारी सकाळी सुरू झालेले विसर्जन आज पहाटेपर्यंत सुरू होते.
५ मुले बुडाली -
मुंबईत गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना काल रविवारी रात्री ९ च्या सुमारास विसर्जनासाठी ५ मुले वर्सोवा जेट्टी येथे गेली असता समुद्रात बुडाली. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व गावकऱ्यांनी २ मुलांना वाचवून पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, नेव्हीचे डायव्हर्स, लाईफ गार्ड यांनी शोध मोहीम राबवली. समुद्रात ज्या ठिकाणी मुले बुडाली त्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात फेरी बोट वापरून शोधकार्य सुरू केले. मात्र, त्या ३ मुलांचा शोध लागला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
निर्बंधांत विसर्जन -
मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण २ लाख मुर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. या मुर्त्यांचे दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते. मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. त्यासाठी भाविक विसर्जनासाठी थेट समुद्र, तलाव आदी ठिकाणी पाण्यात जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पालिका कर्मचारी भाविकांकडून मुर्त्या आपल्या ताब्यात घेऊन नैसर्गिक व कृत्रिम तलावात विसर्जन करत होते.
७३ नैसर्गिक व १७३ कृत्रिम तलाव -
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकार आणि पालिकेने निर्बध लागू केले आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध होते. तसेच, सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेने केले होते.
...तर साथरोग कायद्यानुसार कारवाई -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले. गणेशोत्सवादरम्य़ान गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी पालिकेने नियमावली तयार केली. मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, उत्सवा प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होईल, अशी कोणतीही कृती करू नये. अन्यथा, अशा व्यक्तीवर साथरोग कायदा १८९७, अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता.