मुंबई – कोरोनाच्या लढाईत सर्वाधिक आघाडीवर लढणारे डॉक्टर यांच्यातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या थेट संपर्कात असणाऱ्या डॉक्टरांनाच मोठ्या संख्येने कोरोनाची लागण होत आहे. देशात एकट्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अंदाजे 950 डॉक्टर कोरोनाबाधित झाल्याची माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष आणि आयएमएचे सदस्य यांनी दिली आहे. तर कोरोनामुळे देशात 20 हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉक्टरांच्या वाढत्या मृत्युच्या प्रमाणाने आयएमएमध्ये चिंतेचे वातावरण आहे.देशभरातील खासगी रुग्णालयासह क्लिनिक आणि नर्सिंग होमच्या माध्यमातून आयएमएचे हजारो डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. धारावीमधील कोरोना नियंत्रणात आणण्यात आयएमएच्या डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. मात्र, दुसरीकडे डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे.
कोरोनातून बरे झाल्यानंतर डॉक्टर पुन्हा रुग्णांना सेवा देत आहेत. काही प्रसिद्ध-नामांकित डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रविवारी बोरिवलीतील एका वरिष्ठ आयएमए डॉक्टरचा मृत्यू झाला असून दिल्लीतील ही एका डॉक्टरचा कोरोनाने बळी घेतल्याचे आयएमएचे सदस्य शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.
पीपीई किट न मिळणे हे वाढत्या संसर्गाचे कारण
अनेक डॉक्टरांना पीपीई किट न मिळणे हे डॉक्टरांना संसर्ग होण्याचे एक मोठे कारण सांगितले जात आहे. आयएमएचे डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्ण सेवा देत आहेत. डॉक्टरांसह त्यांचे कुटुंब कोरोनाबाधित होत आहेत. डॉक्टर मृत्युमुखी पडत आहेत. पण तरीही खासगी डॉक्टरांना विमा कवच काही मिळत नाही, असे म्हणत डॉ. उत्तुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्व डॉक्टरांना पीपीई किट देण्यात यावे. तसेच खासगी डॉक्टरांसह खासगी रुग्णालयातील नर्स-आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा द्यावा, अशी मागणी पुन्हा डॉ. उत्तुरे यांनी केली आहे.दिवसेंदिवस राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत यावरही आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. टाळेबंदी खुली होताना अनेक नागरिक कोणतीही काळजी न घेता बाहेर फिरत आहेत. काही जण मास्क ना लावता, शारीरिक अंतर न पाळता वावरत आहेत. तेव्हा नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे भारतीय वैद्यकीय संघटनेने आवाहन केले आहे. स्वतःसह समाजाचे कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहनही आयएमएने केले आहे.