मुंबई - जगभरातील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून विविध विषयांना वाटा मोकळ्या करून देणाऱ्या आयआयटी टेकफेस्टच्या लेक्चर सिरीजला आजपासून सुरूवात होत आहे. या व्याख्यानमालेला कोरोनाचा फटका बसल्याने यंदा ही व्याख्यानमाला ऑनलाईन होत आहे. पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय किर्तीचे जीवन प्रशिक्षक म्हणून ओळख असलेले गौर गोपाल दास आणि मिस इंडिया झोया अफरोज यांचे आज सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन लेक्चर होणार आहे. यात हे नागरिकांना मानसिक बळ मिळावे यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांना हे दोघेही उत्तरे देणार आहेत.
गौर आणि अफरोज हे दोघेही नागरिकांना या जागतिक महामारी कोरोनाच्या काळात घरी राहून सुरक्षित कसे रहावे, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे या काळात जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसे पहावे याबाबत सल्ले देणार आहेत.
देशभरात कोरोनामुळे असंख्य नागरिक भीतीच्या आणि नैराश्याच्या सावटाखाली तर विद्यार्थी परीक्षाच्या अनिश्चितेमुळे संभ्रमात सापडले आहेत. अशा नैराश्यात सापडलेल्या नागरिकांना पुन्हा आपले जीवन नव्या पद्धतीने सुरू करण्यासाठी जागतिक कीर्तीचे लाईफ कोच गौर गोपाल दास नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा, यासंदर्भात असंख्य प्रश्न विचारण्याची संधी नागरिकांना यावेळी मिळणार आहे. टेकफेस्ट ऑफिसीअल पेजवर या दोन्ही पाहुण्यांचे भाषण होणार असून कमेंटच्या माध्यमातून नागरिकांना आपले प्रश्न विचारता येणार असल्याचे आयआयटी टेकफेस्ट टीमकडून आज सांगण्यात आले आहे.