मुंबई - मुंबईमधील क्षयरोग (Tuberculosis / TB) प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने क्षयमुक्त मुंबईचे ध्येय गाठण्यासाठी रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची आय.जी.आर.ए. (IGRA / Interferon Gamma Radioimmune Assay) ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येणार आहे. क्षयरोग प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ( Department of Public Health ) कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
आय.जी.आर.ए. चाचणी - मुंबई महानगरपालिकेकडून राबवण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत ज्यांच्या थुंकीमध्ये क्षयरोगाचे जंतू आढळून आले आहेत. अशा क्षयरोगाचे निदान झालेल्या रूग्णाच्या निकटच्या संपर्कातील,व्यक्तिंची, कुटुंबियांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी प्रामुख्याने सदर घरातील इतर कुटुंबियांना क्षयरोग आजार असल्याबाबत देखील निदान व्हावे. या दृष्टीने त्यांची क्षयरोग विषयक आय.जी.आर.ए. (IGRA / Interferon Gamma Radioimmune Assay) ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येणार आहे. या चाचणीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सुदृढ व्यक्तिला क्षयरोगाची लक्षणे नसताना देखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खातरजमा करण्याकरीता आय.जी.आर.ए. चाचणी केली जाते.
हेही वाचा - Inflammatory Diet : नैराश्याशी जोडलेला आहे दाहक आहार - अभ्यास
आय.जी.आर.ए. वेद्यकीय चाचणीचा अहवाल ‘सुप्त– क्षयरोग’ (TB Infection) यासाठी बाधित नसल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तिला क्षयरोगाचे संक्रमण नसल्याची खातरजमा होते. तथापि, अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून क्षयरोग बाधेबाबत सदर व्यक्तिची त्या पुढील २ वर्षे पर्यंत नियमितपणे पाठपुरावा तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकारची पाठपुरावा तपासणी प्रत्येक ६ महिन्यातून एकदा यानुसार करण्यात येईल. मात्र, जर आय.जी.आर.ए. वैद्यकीय चाचणीचा अहवाल हा ‘सुप्त – क्षयरोग’ यासाठी बाधित असल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तिला ‘क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार’ (TB Preventive Therapy- TPT) हे आठवड्यातून एकदा व एकूण १२ आठवडे दिले जातील. तसेच क्षयरोग बाधेच्या अनुषंगाने पुढील २ वर्षे त्या व्यक्तिचा नियमितपणे पाठपुरावा केला जाईल.
खाजगी प्रयोगशाळेबरोबर करार - आय.जी.आर.ए. वैद्यकीय चाचणी करण्याकरीता एका खाजगी प्रयोगशाळेबरोबर बृह्न्मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) करार केला आहे. या करारा अंतर्गत सदर उपक्रमाच्या सर्व बाबी (end to end management) संबंधित प्रयोगशाळेद्वारे करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुदृढ व्यक्तिंची यादी घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्या घरी जाऊन रक्ताचे नमुने घेणे, चाचणी करणे, चाचणीचा अहवाल जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याला देणे ह्या सर्व बाबी समाविष्ट असणार आहेत. सदर वैद्यकीय प्रयोगशाळेला क्षयरोग प्रतिरोधी उपचाराकरीता पात्र सदस्यांची यादी देण्यात आल्यावर त्यांचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्या यादीतील व्यक्तिंच्या सोयीनुसार वेळ घेऊन सदर घराला भेट देतील. त्यांनतर वैद्यकीय चाचणीसाठी रक्ताचे नमुने गोळा करून चाचणी झाल्यावर चाचणीचा अहवाल जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याला देण्यात येईल. सदर अहवालातून क्षयरोग बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असल्यास संबंधितांना क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचाराची औषधे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत बृह्न्मुंबई महानगरपालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांमधून निशुल्क देण्यात येतील. क्षयरोग विषयक वैद्यकीय चाचणी करण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक ते सहकार्य करावे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोगविरोधी लढ्यास बळ द्यावे असे डॉ. गोमारे यांनी म्हटले आहे.
सुप्त क्षयरोग - सुप्त क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात. तसेच अशी बाधा झालेल्या व्यक्तिंमध्ये क्षयरोगाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे नसतात. तथापि, सुप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तिमध्ये भविष्यात ‘सक्रीय क्षयरोग’ उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्त क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर वेळच्यावेळी योग्य ते उपचार केल्यास संबंधीत व्यक्तिस भविष्यात सक्रीय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळेच सुप्त क्षयरोगाचे मापन व विश्लेषण करणारा हा प्रकल्प मुंबईच्या सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
आय.जी.आर.ए. चाचणी - सामान्यपणे क्षयरोग विषयक वैद्यकीय चाचण्यांमध्ये सुप्त क्षयरोगाचे निदान होत नाही. त्यामुळे सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी ‘आय.जी.आर.ए.’ (Interferon Gamma Release Assay / IGRA) चाचणी करावी लागते. या अंतर्गत संबंधीत व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन ही चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल सामान्यपणे चाचणी केल्यापासून २४ तासांमध्ये मिळतो.