मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम/पूर्व’ म्हणजेच गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द विभागामध्ये ‘क्लॅप’ म्हणजेच कम्युनिटी लेड अॅक्शन, लर्निंग अॅण्ड पार्टनरशिप हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचा एक भाग म्हणून आय-कॉल या विनामूल्य हेल्पलाईन सेवेचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
६० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न -
महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ‘एम/पूर्व’ हा झोपडपट्टी बहुल तसेच अनियोजित स्वरुपात विखुरलेल्या वस्तींनी व्यापलेला विभाग आहे. या विभागातील नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या सहकार्यातून 'ट्रान्सफॉर्मिंग एम वॉर्ड' हे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यात ‘क्लॅप’ हा प्रकल्प आहे. या पथदर्शी प्रकल्पात एम/पूर्व विभागामध्ये २४ वस्त्यांमधील सुमारे ६० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. वस्ती पातळीवर लोक सहभागातून कम्युनिटी केअर सेंटर उभारणे, सामुदायिक प्रयत्नातून स्थानिक पातळीवर शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, जीवनमानाचा आर्थिक स्तर उंचावणे आणि या तीनही बाबींमध्ये संवाद, समन्वय व संपर्काचा माध्यम म्हणून आय-कॉल या हेल्पलाईनचा उपयोग करणे, या प्रमुख ४ बाबी क्लॅप प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत. पैकी, आय-कॉल उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.
हेल्पलाईन अत्यंत व्यापक -
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने सन २०१२ मध्ये आय-कॉल हेल्पलाईनची संकल्पना राबवायला सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळी मुख्यत्वे प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत मनोवैद्यकीय सल्ले व समुपदेशन यापुरतीच ती मर्यादीत होती. ‘एम/पूर्व’ विभागात सुरु झालेली हेल्पलाईन ही अत्यंत व्यापक आहे. संबंधित विभागातील नागरिकांना मानसिक ताणतणाव, भीती अशा मानसिक समस्यातून सोडविण्यासह त्यांना स्थानिक पातळीवरील शिधावाटप, आरोग्य, रोजगार, वैद्यकीय सल्ला व माहिती देणे तसेच निरनिराळ्या शासकीय योजना व उपक्रमांची माहिती देणे, हेदेखील यातून साध्य होणार आहे, अशी माहिती टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या डॉ. अपर्णा जोशी यांनी दिली.
गरजा आणि समस्या यांची पूर्तता करणारा -
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपक्रमाचा शुभारंभ करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, आय-कॉल हेल्पलाईनचा उपक्रम फक्त पथदर्शी नव्हे तर नावीण्यपूर्ण देखील आहे. कारण, तो फक्त वैयक्तिक समुपदेशन नव्हे तर सामुदायिक गरजा आणि समस्या यांची पूर्तता करणारा आहे. सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवतानाच इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे नागरिकांच्या वर्तणुकीत झालेले बदल होत. आय-कॉल हेल्पलाईनच्या माध्यमातून विविध माहिती आणि सल्ले पुरविताना संबंधीतांच्या वर्तणुकीत असे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी देखील आणखी भरीव प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा काकाणी यांनी यावेळी व्यक्त केली.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सल्लागार (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, ‘एम/पूर्व’ विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र नौनी, टाटा ट्रस्टच्या शिखा श्रीवास्तवा, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे डॉ. नीलेश गावडे हे सहभागी झाले होते. प्रा. महेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश मधाळे यांनी क्लॅप प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. श्रिष्टी जेटली यांनी आभारप्रदर्शन केले.