मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत केला जातो. पण, आता परिस्थिती पूर्वीसारखी नाही आता शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार बंडखोर गटात आहेत. त्यामुळे येथे दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आपल्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्कवर आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण ज्या शिवाजी पार्क वरून हा सगळा राडा सुरू आहे त्या शिवाजी पार्कचा इतिहास देखील या राड्या इतकाच रंजक आहे.
शिवाजी पार्क ठाकरे कनेक्शन - दसरा मेळावा म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो बाळासाहेब ठाकरे यांचा प्रसिद्ध डायलॉग, 'येथे जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' बाळासाहेबांनंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हा वारसा आता सध्या उद्धव ठाकरे पुढे चालवत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ देखील याच शिवाजी पार्कला साक्ष ठेवून घेतली होती. शिवसेनेच्या जडणघडणीची अनेक पाळमुळे या शिवाजी पार्कमध्ये रुतलेली आहेत. तसंच या शिवाजी पार्कच्या नामकरणात देखील ठाकरे घराण्याचा मोठा वाटा आहे.
काय आहे शिवाजी पार्कचा इतिहास - पूर्वी या शिवाजी पार्कला माहीम पार्क या नावाने ओळखले जायचं. साधारण 19 व्या शतकात मुंबईला प्लेगच्या साथीने प्रचंड ग्रासलं होतं. इंग्रजांच्या काळात या मुंबईचा प्रचंड झपाट्याने विस्तार होत होता. तर, दुसरीकडे प्लेगमुळे होणारे प्रचंड मृत्यू हे इंग्रजांसमोरची डोकेदुखी बनले होते. यात मुख्य शहरावरचा भार कमी करणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे होता. याच कारणाने इंग्रजांनी बॉम्बे सिटी इम्प्रोव्हमेंट ट्रस्टची स्थापना केली. यात माहीम आणि परळ दरम्यान इंग्रजांनी एक उपनगर वसवले ते उपनगर म्हणजे दादर. त्यामुळे दादरला मुंबईतील पहिली नियोजित लोकवस्ती असं देखील म्हटलं जातं.
सुनियोनीत वस्तीत माहीम पार्कचा समावेश - या सुनियोजीत वस्तीच्या प्लॅनमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी सांडपाण्याच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिलं होतं. या नियोजनात दोन इमारतींमधील अंतर किती असावं? किती मजल्याच्या इमारती बांधाव्यात? इथंपासून ते शिक्षणासाठी शाळा कुठे बांधायच्या इथपर्यंत या आराखड्यात नियोजन करण्यात आलं होतं. याच आराखड्यात एका उद्यानासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. ते उद्यान म्हणजे माहीम पार्क. या दादरमध्ये मराठी मध्यमवर्गीय नोकरदारांना त्याकाळी घरं घेतली. त्यानंतर साधारण 1925 च्या दरम्यान प्रबोधनकार ठाकरे पुण्याहून इथं राहायला आले.
प्रबोधनकार ठाकरे यांनी उभारली चळवळ - त्याकाळी ब्राम्हणेत्तर चळवळी उभारल्याने प्रबोधनकार ठाकरे हे मोठे नाव होते. मुंबईत आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रायबहादूर बोले यांच्याबरोबरीने लढणारे नेते अशी त्यांची ओळख होऊ लागली. 1925 मध्येच मुंबई महानगरपालिकेने माहीम पार्क सर्वसामान्यांना वापरासाठी खुले केले. त्याच सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करायची असं सर्वांनी ठरवलं होतं. इतिहास संशोधक राजवाडे, सरदेसाई, जदुनाथ सरकार यांच्या सल्ल्याने 1927 साली ही जयंती साजरी करण्याचं फायनल करण्यात आलं.
आणि माहीम पार्कचं शिवाजी पार्क झालं - छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच 300 व्या जयंतीचे औचित्य साधून प्रबोधनकार ठाकरे यांनी माहीम पार्क चे नाव बदलून शिवाजी पार्क ठेवावे असं सुचवलं. तेव्हा या विभागाच्या नगरसेविका होत्या अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाई या गांधीवादी विचारसरणीच्या राजकारणी होत्या. त्यांनी लागलीच हा विषय महानगरपालिकेत उचलून धरला आणि त्याचा पाठपुरावा देखील केला. नगरसेविका अवंतिका बाईंसह अनेकांच्या प्रयत्नांमुळे अखेर 10 मे 1927 रोजी ठराव क्रमांक 1236 नुसार माहीम पार्कचे नाव बदलून शिवाजी पार्क असे करण्यात आले. याची साक्ष देणारा एक संगमरवरी चबुतरा देखील शिवाजी पार्कवर उभारण्यात आला आहे.
शिवाजी पार्क चळवळींनी बहरला - हाच शिवाजी पार्क पुढे चळवळींनी बहरला. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींचा हा शिवाजी पार्क साक्षीदार आहे. सावरकरांपासून ते प्रबोधनकार ठाकरे पर्यंत असे अनेक दिग्गज नेते या पार्कच्या परिसरात राहिलेत. अगदी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ देखील याच शिवाजी पार्क मध्ये बहरली. हा परिसर तब्बल 28 एकरात पसरलेला आहे. आणि याच शिवाजी पार्क वरून सध्या महाराष्ट्रात राजकीय राडे सुरू आहेत.
हेही वाचा - दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून पेच, मुंबई महापालिकेची डोकेदुखी वाढणार