मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. घरविक्री ठप्प झाली असून सर्व बांधकामे बंद आहेत. परिणामी आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डरांना घरांच्या किमती कमी कराव्या लागतील. त्यामुळे लवकरच देशभरातील घरांच्या किमतीत तब्बल 15 टक्क्यांनी घट होऊन घरे स्वस्त होतील, अशी माहिती नुकतीच एका अहवालातून समोर आली आहे.
हेही वाचा... मुंबईत नवीन 692 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर
मागील 10-12 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. मात्र, तरीही या दरम्यान घरांच्या किंमती काही कमी झालेल्या नाहीत. विक्री विना अनेक घरे पडून राहिली तरी चालेल. परंतु घरांच्या किमती कमी करायच्या नाहीत, अशी काहीशी भूमिका बिल्डरांची आहे. आता मात्र या संपुर्ण क्षेत्राला बसलेला फटका खूप मोठा आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पुढची अनेक वर्षे वाट पाहावी लागणार आहे. तर त्याचवेळी देशाला सर्वाधिक महसूल देणारे हे क्षेत्र असूनही या क्षेत्राला केंद्राकडून मोठे पॅकेज मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा या क्षेत्राला आणखी नुकसान सहन करावे लागणार आहे.
लियासिस फोरस या कंपनीने या सर्व परिस्थितीचा आढावा घेत एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम म्हणून सध्या या क्षेत्रातील महसुलात 43 टक्क्यांची घट झाली आहे. तर घरविक्री थेट 33 टक्क्यांनी घटली आहे. येत्या काळात बेरोजगारी वाढणार असून आर्थिक मंदी वाढणार आहे. अशावेळी घर विक्रीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही.
हेही वाचा... मद्यसाठ्यात घोटाळा: भाजप आमदाराच्या पत्नीच्या नावावरील वाईन शॉपचा परवाना रद्द
लियासिस फोरसचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील घरांच्या किमती 15 टक्क्यांनी कमी होतील. हा परिणाम लवकरच दिसून येईल. बांधकाम क्षेत्रासाठी ही बाब चिंताजनक असली, तरिही ग्राहकांना मात्र यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे कपूर यांनी सांगितले आहे.