मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील विविध घटकांशी, विरोधी पक्षाशी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंध लादले आहेत. पुढील 15 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. हॉटेल व्यवसाय देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, फक्त होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिकांची संघटना असलेल्या आहारने नाराजी व्यक्त केली आहे.
या अगोदर झालेल्या लॉकडाऊनमध्ये तब्बल 7 महिने मुंबई शहरातील सर्व हॉटेल बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे आधीच हॉटेलचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना कुठलेही आर्थिक पॅकेज देण्यात आले नव्हते, आणि आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र हॉटेल व्यवसायिकांसाठी अशाप्रकारचे कुठलेच आर्थिक पॅकेज जाहीर न केल्याने याचा फटका हॉटले व्यवसायाला बसणार असल्याचं आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे. नव्या निर्बंधांमध्ये हॉटेलचालकांना पार्सल आणि घरपोहोच सेवा पुरवण्यासाठी शासनाकडून मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळे नुकसान भरून निघणार नसल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?
निर्झर बर्वे हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. मागे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांना प्रचंड नुकसान झाले होते. आणि आता पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आल्याने, पोळीभाजी केंद्र बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कसा आणि काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडायचे कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अनेकांचा रोजगार बुडाला
शहरामध्ये 80 हजारांहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियरबार व इतर आस्थपणांची नोंद आहे. या मधील सर्वाधिक मोठी संघटना असलेल्या आहारचे प्रमुख शिवानंद शेट्टी यांनी म्हटले की, मुंबई शहरात असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियरबार सारख्या माध्यमातून अकुशल कामगारांना एक मोठा रोजगार सध्याच्या घडीला मिळतो आहे. याबरोबरच राज्य शासनाला 500 कोटी रुपयांचा महसूलसुद्धा मिळतो. या लॉकडाऊनमुळे अनेक जणांनाचा रोजगार बुडाला आहे.
हेही वाचा - सीबीएससीची दहावीची परीक्षा रद्द; तर बारावीची परीक्षा लांबणीवर