मुंबई - कोरोनाबाबत सकारात्मक बातमी आहे. 100 वर्षांच्या निवृत्त शिक्षकाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. महापालिकेच्या जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना कोरोनामधून बरे करण्यात आले आहे. त्यांचा वाढदिवसही रुग्णालयात साजरा करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
कोरोनावर मात केलेल्या निवृत्त शिक्षकाचा जन्म 15 जुलै 1920 रोजीचा आहे. शतकपूर्ती होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांना कोरोनाने गाठले. घरच्या सगळ्याच मंडळींच्या काळजाचा ठोका चुकला. आजोबांचा ‘पॉझिटिव्ह रिपोर्ट’ आल्यानंतर लगेचच 1 जुलै रोजी महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांचे वय लक्षात घेता, रुग्णालयातील डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली. पूर्वाश्रमीचे शिक्षक असणाऱ्या निवृत्त शिक्षकानेही उपचारांना चांगला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली.
15 जुलैला 101 व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या या आजोबांना आज रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली. त्याचबरोबर शतकपूर्तीचा वाढदिवस साजराही करण्यात आला. कोरोनावर मात करणाऱ्या या आजोबांनीही आपल्या खणखणीत आवाजात डॉक्टरांचे आणि कर्मचारऱ्यांचे आभार मानत आपल्या घराकडे कूच केली.
या निवृत्त शिक्षकांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कार्यरत आहेत. ते सध्या आपल्या मुलांकडे कांदिवली परिसरात राहतात. त्यांच्या घरातील काही व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांनाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांना न्युमोनियादेखील असल्याचे लक्षात आले. मग अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना रुग्णालयातून घरी सुट्टी देताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आवर्जून केक आणून शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करत त्यांचे आशिर्वाद घेतले. तर या आजोबांनीही रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.