मुंबई - विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गंभीर आरोप करत सभागृहात ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ क्लिप सादर ( Devendra Fadnavis Allegation On MVA ) केली. याबाबतचा एक पेन ड्राइव्ह विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या स्वाधीन केला. महाविकासआघाडी सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न खुद्द सरकारी वकील आणि नेते मंडळीकडून केला जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी सभागृहात केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर उद्या विधानसभेत आपण सविस्तर उत्तर देणार असून, आपण दिलेल्या उत्तरानंतर 'दूध का दूध, और पानी का पानी' होऊन जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( HM Dilip Walse Patil ) यांनी दिला.
सभागृहात उपस्थिती कमी
विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेमध्ये केलेल्या काल आरोपांवर विधानसभेमध्ये आपण आजच उत्तर देणार होतो. मात्र, आज सभागृहात उपस्थिती कमी होती. त्यामुळे आपल्याला उत्तर देण्यासाठी उद्याची वेळ देण्यात यावी अशी विनंती आपण विधानसभा अध्यक्षांना केल्यानंतर त्यांनी ही विनंती मान्य केली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.