मुंबई - कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. या संदर्भात राज्यभरात कोरोनाच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे, मालेगाव, औरंगाबाद, मुंबईसह इतर ठिकाणी एसआरपीएफच्या 63 कंपन्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. यात 545 जवान कोरोना संक्रमित झाले होते. या जवानांवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील 388 जवान हे पूर्णपणे बरे होऊन घरी गेल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतर एसआरपीएफ जवनांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिजिटल माध्यमातून या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यातून त्यांचे मनोबल उंचाविण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी केला. यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना योग्य उपचारासह, सर्व प्रकारच्या सोई मिळत असल्याचे गृहमंत्र्याना सांगितले.
कोरोनाचा सामाना करणाऱ्या राज्यातील पोलिसांना कोरोना संक्रमित झाल्यास सर्व प्रकारचे उपचार करण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
राज्यात, 2211 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यात तब्बल 249 पोलीस अधिकारी असून 1962 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यँत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 970 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 83 पोलीस अधिकारी व 887 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 1216 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 165 पोलीस अधिकारी व 1051 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस खात्यातील 200 हुन अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.