मुंबई - अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करून आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. यासंदर्भात उचीत चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया बॉलिवूड इव्हेंटच्या नावाखाली भारता विरोधी कारवाया करणाऱ्या या टोळीच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून आवाज उठणाऱ्या शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवून केंद्रीय गृह मंत्रालयाने या कारवाईची माहिती दिली आहे. 'आयएसआय'ला आर्थिक मदत करणाऱ्या रेहान सिद्दीकीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या बड्या बॉलिवूड कलाकारांची ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी आता लावून धरली आहे. ह्युस्टन, अमेरिका येथून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कागदपत्रांच्या आधारे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सुमारे 3 वर्षांपुर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तक्रार दाखल केली. अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करणारा पाकिस्तानी रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांसाठी आयएसआय या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत असल्याची माहिती या तक्रारीत करण्यात आली होती. तसेच सिद्दीकीच्या रेडिओ चॅनल, सोशल मीडिया मार्फत होणारा भारतविरोधी प्रचार याचीही माहिती देण्यात आली. रेहान सिद्दीकीसह राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्यावर बंदी घालून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांची भेट घेतल्यावर ह्युस्टन येथील हायकमिशनला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
अनिल देशमुख म्हणाले यासंबंधी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेले पत्र मला आहे. मी गृह विभागाच्या माध्यमातून या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करेल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - 'त्या' कार्यक्रमात सामील झालेल्या सेलिब्रिटींची केंद्रीय चौकशी करा; खासदार राहुल शेवाळेंची मागणी