मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील प्रभारी बनवण्यात आलेले आहे. बिहार पोलीस दलाचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे राजीनामा देऊन आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुशांतसिंह प्रकरणी सहकार्य न केल्याचा आरोप त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर टीका केली होती. अशा स्थितीत पांडे यांच्यासाठी फडणवीस प्रचार करणार का, असा खोचक प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे.
हेही वाचा - '..म्हणून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा नाही, 'त्या' अटीवर चर्चा करण्यासाठीच राऊत यांची भेट'
बिहार निवडणूक लक्षात घेऊन सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपाने राजकारण केल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. 'महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात टीकाटिप्पणी करून गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची जनता व महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला होता. राज्यात पाच वर्षं महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात तपास व्यवस्थित केला नसल्याचे वक्तव्य करून मुंबई पोलिसांचा अपमान केला होता,' असे देशमुख यांनी म्हटले आहे.
'गुप्तेश्वर पांडे यांनी पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते निवडणूक लढवत आहेत. आता बिहारमध्ये भाजपाचे प्रभारी म्हणून गेलेले फडणवीस हे गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का,' असा खोचक प्रश्न गृहमंत्री देशमुख यांनी विचारला आहे.
हेही वाचा - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची झारखंडच्या माता छिन्नमस्तिका मंदिर, बोरिया बाबा आश्रमाला भेट