मुंबई - विधानसभेच्या अधिवेशनात गेल्या चार दिवसांपासून सतत तणावाचे वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकांविरोधात उभे ठाकल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पण विदर्भातील नेत्यांच्या जुगलबंदीने हा तणाव निवळला. तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो..असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केला आणि संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंग
महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभलेली आहे. राजकीयदृष्टया एकेमेंकाविरोधात असलेल्या नेत्यांचेही वैयक्तिक स्नेहबंध आहेत. त्याचेच प्रत्यंतर बुधवारी विधानसभेत आले. विदर्भातील मंत्र्यांना चांगली खाती दिली नाहीत असा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. गृहमंत्र्यांना विकासाचे खाते देण्यापेक्षा आरोपींच्या मागे पळायला लावले, सुनील केदार यांना जलसंपदासारखे चांगले खाते दिले नाही आणि कोंबड्या, जनावरांचे खाते दिले. विजय वडेट्टीवार यांनाही मदत आणि पुनर्वसनसारखे दुय्यम खाते दिले, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - जळगावात कोविड सेंटरमध्ये रुग्णाने आणल्या मद्याच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले
यावर खुमासदार भाषेत उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ मागची पाच वर्षे तुम्ही विसरलात. विदर्भाचे देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री झाले यामध्ये आनंद आहे. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा किती सिनीअर होता. तरीही तुम्ही तुमचे दु:ख पाच वर्षे लपूनच ठेवले ना? अनेकदा तुम्हाला भेटायचो. सुधीरभाऊ क्यों मायूस हो? त्यावेळी सुधीरभाऊ हसायचे आणि म्हणायचे कोठे काय? मी कोठे नाराज आहे. पण तुमच्या मनातलं आम्हाला कळत होतं. माझा मुख्यमंत्रीपदाचा चान्स होता पण माझा नंबर लागला नाही. तुम्हाला पाहून मला जगजितसिंह यांची एक गझल आठवते. तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो आखोमे नमी हसी लबोंपे क्या हाल है क्या दिखा रहे हो!