मुंबई : बेकायदेशीर आंदोलन करणे तसेच हिंसक कृत्य करण्याच्या आरोपाखाली विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला ( Mumbai Sessions Court Grants Bail To Hindustani Bhau ) आहे. मध्यंतरी त्याचा जामीन अर्ज वांद्रे न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. धारावी परिसरात विद्यार्थ्यांनी केलेल्या ( Dharavi Student Agitation ) आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊ जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करून धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली होती. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ न्यायालयीन कोठडीत आहे. हिंदुस्थानी भाऊकडून ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला.
काय आहे प्रकरण?
३१ जानेवारी रोजी मुंबईच्या धारावी परिसरात दहावी बारावीच्या ऑफलाइन परीक्षाविरोधात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. यावेळी हिंदुस्तानी भाऊ देखील उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याआधी हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्याने विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देण्याची सक्ती का केली जात आहे ? असा प्रश्न करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चिथवण्यात हिंदुस्तानी भाऊचा हात होता, हे सिद्ध झाल्यानंतर हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. हिंदुस्तानी भाऊ विरोधात इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चिथवल्याप्रकरणी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्या सुटकेची शक्यता
उद्या आर्थर रोड जेल मधून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे हिंदुस्तान भाऊच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी मुंबई सत्र न्यायालयात युक्तिवाद केला आहे.