मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतल्यानंतर एकीकडे मनसे आणि भाजपची जवळीक अधिक वाढताना दिसते आहे तर, दुसरीकडे अनेक महाराज, साधू, महंत हे राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन भेट घेत आहेत. आज हिंदू सेवा संघ (Hindu Swayamsevak Sangh) व अयोध्येतील हनुमान गढीचे (ayodhya Hanuman garhi) प्रमुख महंत राजूदास महाराज यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
अयोध्येचे दोन प्रमुख महंत शिवतीर्थावर: विश्व हिंदू सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक व अयोध्या हनुमान गढ़ीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज व उदासीन अखाड्याचे महंत धर्मदास महाराज हे शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. ह्या दोन्ही भेटी सदिच्छा होत्या अशी माहिती मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. या भेटीत या दोन महंतांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊन रामाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण देखील दिल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले.
श्रीरामाची इच्छा असेल तेव्हा दौरा नक्की होईल: काही दिवसांपूर्वीच विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत मोठे विधान केलं होतं. या दौऱ्यात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. यासोबतच त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्याही बैठकी घेतल्या होत्या. यावेळी राज ठाकरेंनी, "भगवान राम जेव्हा अयोध्येला बोलावतील, तेव्हा मी अयोध्येला जाईन." असं विधान केलं होतं.
दरम्यान, याआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच अयोध्येत पाऊल ठेवावं, असं ब्रिजभूषण सिंह म्हणाले होते.