मुंबई - मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत कोरोना विषाणूने अनेक रूप बदलली आहेत. कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरियंटने मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रसार झाला आहे. कोणत्या विषाणूचा प्रसार होत आहे याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेकडून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग चाचण्या ( Genome Sequencing Test ) केल्या जात आहेत. १२ जून ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत BA.२.७५ च्या विविध व्हेरियंटचा सर्वाधिक प्रसार होता असे समोर आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ( Corona Variants in Mumbai )
जिनोम सिक्वेंसिंग चाचण्या - कोविड - १९ विषाणूच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग चाचण्या ऑगस्ट २०२१ पासून फेरीनिहाय करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार १५ व्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. १५ व्या फेरीतील चाचण्यांसाठी १२ जून ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील असणारे सर्व नमुने अर्थात १०० टक्के नमुने हे ओमायक्रॉन या व्हेरियंटने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड विषाणूच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग चाचण्या केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक व्हेरियंटमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली आहे.
जिनोम सिक्वेन्सिंग का ? मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत याची माहिती मिळवण्यासाठी पॉजिटीव्ह रुग्णांचे नमुने घेऊन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातात. कोरोना पॉजिटीव्ह तसेच जे रुग्ण लवकर बरे होत नाहीत अशा रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांसाठी पाठवले जातात. यामुळे रुग्णांना नेमका कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग आहे याची माहिती मिळते. अशी माहिती मिळाल्याने रुग्णांवर वेळीच उपचार करता येतात. तसेच एखाद्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यास त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
BA.२.७५ व्हेरिएन्टचा सर्वाधिक प्रसार - एकूण २८८ नमुन्यांपैकी ३७ टक्के अर्थात १०६ नमुने हे BA.२.७५ व्हेरिएन्टचे आहेत. ३३ टक्के अर्थात ९६ नमुने हे BA.२.७५.१ व्हेरिएन्टचे आहेत. २१ टक्के म्हणजेच ६० नमुने हे BA.२.७५.२ व्हेरिएन्टचे आहेत. २ टक्के अर्थात ६ नमुने हे प्रत्येकी BA.५.२ व BJ.१ या दोन व्हेरिएन्टचे आहेत. एकूण ४ नमुने हे BA.२.७६ या व्हेरिएन्टचे आहेत. ३ नमुने हे BA.२ या व्हेरिएन्टचे आहेत. २ नमुने हे BH.१ या व्हेरिएन्टचे आहेत तसेच BA.२.१०.४, BA.२.७४, BA.५.१, BE.१ आणि BE.३ या व्हेरिएन्टचे प्रत्येकी १ रुग्ण आहेत.
२१ ते ४० या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण - २८८ रुग्णांपैकी ३२ टक्के अर्थात ९१ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटात देखील २७ टाक्के म्हणजेच ७७ एवढे रुग्ण आहेत. २९ टक्के म्हणजेच ८४ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ३ टक्के म्हणजेच १० रुग्ण हे ० ते २० या वयोगटातील; तर ९% म्हणजे २६ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २८८ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील ७ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी ३ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील आहेत. ६ ते १२ वर्षे या वयोगटात एकही नमुना आढळून आला नाही; तर ४ नमुने हे १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ओमायक्रॉन या कोविड विषाणुच्या व्हेरियंटने बाधित असल्याचे आढळून आले. २८८ रुग्णांपैकी १ टक्के अर्थात २ रुग्णांनी लसीचा केवळ एकच डोस घेतला आहे. ७० टाक्के अर्थात २०२ रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर २९ टक्के अर्थात ८४ रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.
कोरोनाच्या नियमांचे पालन करा - कोरोनाच्या विविध व्हेरियंटची होणारी लागण लक्षात घेता. कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने कोविड प्रतिबंधात्मक लसीचे सर्व डोस वैद्यकीय सल्ल्यानुसार वेळच्यावेळी घेणे, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी दुसरा डोस घेणे आणि ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्यांनी लसीचा बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. तसेच नियमितपणे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मुंबईकरांनी या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे.