मुंबई - आर्यन खानला मदत करण्यासाठी साक्षीदार केपी गोसावी आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात कथितपणे दलाली करणाऱ्या सॅम डिसुझाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्यावर कोणतीही सक्तीची कारवाई कऱण्यात येऊ नये आणि कारवाईच्या तीन दिवस आधी नोटीस बजावण्याची मागणीही डिसुझाकडून करण्यात आली आहे. मात्र, सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देत न्यायालयाने सॅम डिसुझा याचा अर्ज फेटाळून लावला आहे.
अटकपूर्व जामीन आणि अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे
सॅम डिसुझाने त्याच्या अर्जात त्याला या प्रकरणात गोवण्यात आले असून गोसावी आणि त्याचा अंगरक्षक प्रभाकर साईल या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत असं म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटी डिसुझाला अटक करून शकते असा त्याला संशय आहे. त्यामुळे डिसुझाने अटकपूर्व जामीन आणि अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावं असं अर्जात म्हटलं आहे. तसेच डिसुझाने कोणतीही सक्तीची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवसांची नोटीस आणि अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र, हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.
ददलानीकडून ५० लाख रुपये घेतले
एनसीबीचा पंच किरण गोसावीने आर्यन खानची सुटका करण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडून ५० लाख रुपये घेतले आणि एनसीबीकडून २३ वर्षीय आर्यनला अटक केल्यानंतर पैसे परत केले होते. तसेच, सॅमने असा देखील दावा केला आहे की, गोसावीने त्याला आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसून तो निर्दोष आहे.
मुंबई उच्च न्यायालयात धाव
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पंच साक्षीदार के.पी गोसावी आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात कथितपणे दलाली करणाऱ्या सॅम डिसुझा या सल्लागारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये, तसेच एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडेंप्रमाणे कारवाईच्या तीन दिवस आधी नोटीस बजावण्याची मागणीही डिसुझाकडून करण्यात आली होती. डिसुझाच्या या याचिकेवर बुधावारी रात्री हायकोर्टातील सुट्टीकालीन कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्यासमोर रात्री उशीराने सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी याचिका ऐकताच ती फेटाळून लावली. ही याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांना आधी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रकरण काय आहे
१ ऑक्टोबर रोजी गोसावी यांनी फोन करून एनसीबी अधिकार्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. २ ऑक्टोबर रोजी सुनील पाटील यांचा फोन आला, त्यांच्याकडून कॉर्डेलिया क्रूझवर एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीला ड्रग्जच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले असल्याचे सांगितले आणि मला तपासण्याची आणि पडताळणी करण्याची विनंती केली. त्यानंतर डिसोझा यांनी ३ ऑक्टोबरला पूजा ददलानी आणि गोसावी यांच्यात एका मित्रामार्फत भेट घडवून आणली. ददलानी तिचा पती, गोसावी आणि डिसोझा यांच्यासह इतर काहीजण लोअर परळ येथे भेटले. त्यानंतर आपण निघून गेलो नंतर गोसावीने आर्यनला मदत करण्यासाठी दादलानीकडून ५० लाख रुपये घेतल्याची माहिती मिळाली. मात्र, पुढे किरण गोसावीचा खोटेपणा माझ्या लक्षात आला. त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता. ट्रू कॉलरवर मला ते दिसले. त्यानंतर या कामासाठी जी ५० लाखांची रक्कम घेतली गेली होती ती गोसावीकडे परत मागितली. त्याने ३८ लाख दिले. प्रभाकरकडून ५ लाख आले. बाकीची रक्कम माझ्या एका मित्राने दिली व ५० लाख रुपये शाहरुखच्या टीमकडे परत केल्याचा असा दावा सॅमने केला. गोसावी हा समीर वानखेडे यांच्या नावाचा गैरवापर करत असून वानखेडेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही सॅमने याचिकेत नमूद केले आहे.