मुंबई - महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुराच्या संदर्भात कोल्हापूर व सांगली महानगरपालिकेच्या महापौरांची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर करण्यात आली. सांगली आणि कोल्हापूर येथील समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच केंद्र सरकार राज्य सरकार व केंद्रीय जल आयोग या तिघांनी एकत्र बसून या समस्येवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देत ही याचिका निकाली काढली आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज; कोल्हापूर, सांगलीतही होणार निवडणुका
याचिकेद्वारे सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरांची चौकशी करण्याकरिता एका समितीची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश राज्य शासनाने महानगरपालिकांना द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. सांगली आणि कोल्हापूर येथील धरणांमध्ये असलेल्या पाण्याचे नियोजन योग्यप्रकारे होत नसून केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. धरणातील पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे न झाल्याने कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेला पूर हा मानवनिर्मित असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा - युती होती, आहे आणि राहील; उद्धव ठाकरेंना विश्वास