मुंबई - कल्याण पट्ट्यातील बदलापूर, अंबरनाथ आणि टिटवाळा या परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. परिसरातील काही इमारतींचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच, रात्रभर सुरू असलेल्या संततधारेमुळे उल्हास नदीसुद्धा धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे.
रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे लाईफलाईनही विस्कळीत झाली आहे. एका तासाभरात अंधेरीत ४६ मिमी, दादरमध्ये ३०, कुर्ल्यात ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ४५ ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच कल्याणहून बदलापूरला जाणाऱ्या ट्रेन रद्द झाल्या आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या १५ मिनिटे तर हार्बर रेल्वेमार्गावरील गाड्या ३५ मिनिटे उशिराने धावत आहेत. सायन स्थानकात ट्रॅकवर पाणी साचले आहे.
याशिवाय, हवाई वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. विमानांची उड्डाणे ५० मिनिटे उशिराने केली गेली आहेत. रस्त्यावरुन होणारी वाहतूकही मंदावली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे घाटकोपरजवळ वाहतुकीची कोंडी झाली आहे तर अंधेरीचा सबवेही बंद करण्यात आला आहे.