मुंबई - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( Nawab Malik Rajya Sabha voting permission ) आणि अनिल देशमुख ( Anil Deshmukh Rajya Sabha voting permission ) यांनी राज्यसभेसाठी मतदान करता यावे यासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मात्र, आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली नाही. ईडीने या याचिकेवर उत्तर देण्याकरिता 7 जून पर्यंत वेळ मागितला आहे. त्यामुळे, आता मलिक आणि देशमुख यांच्या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होणार असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने या दोघांना अटक केली होती.
हेही वाचा - Shivrajyabhishek Sohala Raigad : रायगडावर दुमदुमणार जयघोष, राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात
अनिल देशमुख यांच्या मार्फतही राज्यसभेसाठी मतदान करता यावे याकरीता विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आपलाही अर्ज दाखल करून घेण्यात यावा अशी मागणी मलिक यांनी केली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. देशमुख आणि मलिक यांनी दाखल केलेल्या अर्जावर ईडी उद्या आपला निर्णय देणार आहे. या दोन्ही अर्जांवर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे.
विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे, आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे. विधानसभेत 13 अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात अर्ज केला आहे. विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या 54 वर आली आहे. विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी रोजी अपक्ष आमदारांची वर्षावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला किती अपक्ष आमदार उपस्थित राहतात यावर शिवसेनेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढले असतानाच सर्व पक्षांना स्वपक्षाच्या आमदारांचे एक-एक मतही महत्वाचे बनले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते धोक्यात आली आहेत. कारण राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आजी-माजी मंत्री आणि आमदार सध्या तुरुंगात आहेत. या दोघांनाही मतदान करता येणार की नाही याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही.
मैदानात कोण?
शिवसेना
संजय राऊत
संजय पवार
भाजप
पीयूष गोयल
डॉ. अनिल बोंडे
धनंजय महाडिक
काँग्रेस
इमरान प्रतापगढी
राष्ट्रवादी
प्रफुल्ल पटेल
विधानसभेतील संख्याबळ
शिवसेना -54
राष्ट्रवादी-53
काँग्रेसचे -44
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
एमआयएम - 2
प्रहार जनशक्ती पक्ष - 2
कम्युनिस्ट पक्ष - 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
मनसे - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1
जनसुराज्य शक्ती - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
अपक्ष -13
हेही वाचा - Mumbai Police at Salman Khan house : सलमान खानच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल, सुरक्षेचा घेणार आढावा