मुंबई - आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. काल (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाचे कामकाज संपल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी आता आज (बुधवारी) घेतली जाणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच जाणार की जामीन मिळणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मनीष राजगढीया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर झाला आहे.
आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रूझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले. आर्यन खानचा संबंध फार तर अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो. पण यातील अचित कुमार हा क्रूझवर नव्हता. त्याला घरून अटक करण्यात आली आहे. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाईन गेमिंग संदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चॅटिंग 12 ते 14 महिन्यांपूर्वी झाली आहे, असा दावा रोहतगी आणि आणि अमित देसाई यांनी केला.
सुनावणीपूर्वीच कोर्टात नाट्यमय घटना
मुकूल रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामांतर्गत गुन्हा सिद्ध झाला तर किमान 1 वर्षाची शिक्षा दिली जाते. कोर्टाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे?, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानची चॅटिंग ही सगळी क्रूझ पार्टीच्या आधीची असल्याचा दावा रोहतगी यांनी केला. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीपूर्वीच कोर्टात नाट्यमय घटना घडली. या सुनावणीसाठी कोर्टात झालेली प्रचंड गर्दी पाहून न्यायमूर्ती संतापले आणि न्यायासनावरून उठून गेले.
कोर्टाचे कामकाज थांबले
शाहरुख खान याने आर्यनच्या सुटकेसाठी वकिलांची फौज उभी केली होती. आर्यनच्या जामिनावरील सुनावणीसाठी कोर्टात मंगळवारी मोठी गर्दी झाली होती. आर्यन प्रकरणाशी संबंध नसलेल्या वकिलांनीही गर्दी केली होती. ही गर्दी पाहून न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठून गेले आणि कोरोना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी कोर्टतील सबंधीत विभागाला सांगितले. न्यायमूर्तींच्या आदेशानुसार गर्दी कमी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे प्रकरण सुनावणीला नाही, त्यांना कोर्टाबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कोर्टाचे कामकाज थांबले. असोशिएटच्या निर्देशानुसार पोलिसांनी सगळ्यांना बाहेर काढले. सर्व पत्रकारांनाही बाहेर काढले. आर्यनच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी पत्रकारांना प्रथम प्रवेश दिला जाईल, अशी हमी कोर्टाच्या असोशिएटने दिली आहे. कोर्टाबाहेरही कोरोनाविषयक नियमांचे तीनतेरा वाजले आहेत. वकिलांनी विनाकारण गर्दी केली आहे. त्यामुळे वकील वर्ग आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.
एनडीपीएस कोर्टाकडून जामीन
क्रूझ ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोपी मनीष राजगीर आणि अविन साहू या दोघांना विशेष एनडीपीएस कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले हे पहिले आरोपी आहेत. मनीष राजगीर याच्यावर 2.4 ग्रॅम गांजा बाळगल्याचा आरोप होता आणि अविन साहू याच्यावर ड्रग्सचे सेवन केल्याचा आरोप होता. क्रूझवरून या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, विनंती करूनही एनसीबीने आपल्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले नसल्याचा दावा अविन साहू याने केला होता.
हेही वाचा - दहिसर नाक्यातून 27 किलो चरस जप्त, मुंबई पोलिसांची कामगिरी