मुंबई - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापुढे 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी होमआयसोलेशन बंद करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यापुढे प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णावर कोविड सेंटरमध्येच उपचार होतील, असेही टोपे म्हणाले. यावेळी त्यांनी म्यूकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन-बी या औषधासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेशही दिले. तसेच यासाठी 30 कोटींची तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले.
18 जिल्ह्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद -
आज झालेल्या बैठकीत कोरोना संदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. त्या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करून कोविड केअर सेंटर वाढवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
पॉझिटिव्हीटी रेट जास्त असणारे जिल्हे -
सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर या 18 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे.
कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात घट -
राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर, तर पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांवर आल्याचे टोपे म्हणाले. तसेच राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.5 टक्क्यांपर्यंत घटल्या असल्याचीही माहिती राजेश टोपेंनी दिली.
ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी कोरोना केंद्रासाठी वापरावा -
ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.