मुंबई -दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकझसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तबलिगी बांधवांनी पोलीस, प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाजाच्या धर्मगुरुंची बैठक घेतली. यावेळी तबलिगी धर्मगुरूंनी आरोग्यमंत्रांच्या उपस्थितीत समाजातील बांधवांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या खोट्या संदेशांकडे दुर्लक्ष करून माणुसकी आणि देशहीत जपत जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहनही केले. मरकझमध्ये सहभागी झालेले राज्यातील तबलिगी बांधव स्वत:हून प्रशासनकडे जाऊन संपर्क साधतील अशी ग्वाहीही या धर्मगुरूंनी यावेळी आरोग्यमंत्र्यांना दिली.
जातीय सलोखा राखण्यासाठी धर्मगुरुंसोबत बैठक घेण्यातबाबत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार काल रात्री आरोग्यमंत्री टोपे यांनी त्यांच्या निवासस्थानी मुंबईतील तबलिगी समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेतली. यावेळी मुफ्ती शौकत, मौलाना असद कासमी, अनीस भाई, डॉ. आरीफ हमदानी आदी उपस्थित होते.
निजामुद्दीन येथे झालेल्या मरकझमध्ये भाग घेतलेल्या राज्यातील नागरीकांचा जिल्हास्तरावर शोध सुरू आहे. पुणे, पिंपरी चिंवड, अहमदनगर, हिंगोली येथील सात व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह आढळल्या आहेत. त्यांच्या निकटसहवातील पाच जण देखील पॉझीटिव्ह आढळून आले आहेत. अशा ज्या व्यक्ती दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यांनी स्वत:हून प्रशासनाला, आरोग्य विभागाला तपासणीसाठी सहकार्य करावे, असे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
धमर्गुरूंनी बैठकीतूनच तबलीगी समाजबांधवांना सहकार्य करण्याबाबत आवाहन केले आहे. सोशल मिडीयावर सध्या जातीय द्वेष पसरवणारे संदेश, चित्रफिती व्हायरल होता आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून देशाहिताला प्राधान्य देतानाच माणुसकी जपत समाजात जातीय सलोखा, बंधुभाव कायम राण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही धर्मगुरूंनी समाजबांधवांना केले आहे.