मुंबई - गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना धमकावले. तसेच, या नागरिकांकडे खंडणी मागितल्याचा प्रकारही समोर आला आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीस मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. (23 जून)रोजी जोगेश्वरी पोलीस ठाणे येथे या प्रकरणातील तक्रारदार राजीव वसंत ताम्हणे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या मुलाला मारण्याची धमकी
या प्रकरणातील तक्रारदार यांना अटक आरोपीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. यामध्ये तक्रारदाराचा मुलगा हा रमेश घाडी नावाच्या इसमास वाहन कर्जासाठी जामीन राहिला आहे. दीड लाख रुपये किमतीचे कर्ज व त्यावरील व्याज दिले नाही, तर तक्रारदाराच्या मुलाला घरात घुसून ठोकून काढीन, अशी धमकी देऊन या व्यक्तीने शिवीगाळ केली. यानंतर राजू ताम्हणे यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर हा गुन्हा क्राईम ब्रँचकडे तपासासाठी आला होता. पोलिसांनी सदरच्या मोबाईल क्रमांकाचा तपास सुरू केला. दरम्यान, हा व्यक्ती बदलापूर येथे राहणारा असून, सतत स्वतःचे लोकेशन बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.
नोकरी गेली म्हणून खंडणी मागण्यास सुरुवात
अटक व्यक्ती हा एका खाजगी फायनांन्स कंपनीत वसुली एजंट म्हणून दोन महिन्यांपासून काम करत होता. मात्र, यामुळे त्याची नोकरी गेल्याने, तो सध्या आर्थिक अडचणीत सापडला होता. यामुळे त्याने बनावट कागदपत्र वापरून बनावट पत्त्याच्या आधारावर मोबाईल सिम कार्ड घेऊन, ज्येष्ठ नागरिकांना धमकावले. शिवीगाळ करून त्यांच्याकडून खंडणी मागण्यात सुरुवात केली होती. अटक व्यक्तीने इतर नागरिकांनाही खंडणीसाठी धमक्या दिल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.