मुंबई - मुंबईत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या 'विधानगाथा' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या सहीत राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना फडणवीस यांनी, सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. भाजपात येणाऱ्यांची नावेही मला वर्तमानपत्रातून कळतात, असे बोलताच सभागृहात एकच हशा पिकला.
पुस्तक लिहण्याची प्रेरणा मुख्यमंत्र्यांकडून घेतली - हर्षवर्धन पाटील
संसदीय कार्यमंत्री म्हणून दहा वर्ष विधिमंडळात काम केले आहे, पण पुस्तक लिहण्याची प्रेरणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळाली. असे हर्षवर्धन पाटील यांनी पुस्तक प्रकाशनावेळी सांगितले. अर्थसंकल्पावर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तक लिहले आहे. अर्थसंकल्पाचे बारकावे यांनी या पुस्तकात खुलासेवार सांगितले आहेत. यातूनच पुस्तक लिहण्याची प्रेरणा मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. मी व्यवसायिक लेखक नाही पण या अनुभवाचा लोकप्रतिनिधी आणि अभ्यासकांना लाभ व्हावा यासाठी हे पुस्तक लिहले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो होते ,पण त्या संदर्भात उलट सुलट बातम्या आल्याचे त्यांनी सांगितले .
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील यांच्या 'विधानगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची स्तुती करत म्हटले की, संसदीय कार्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी केलेले काम मोलाचे आहे. गेल्या चार वर्षात त्यांच्या सारख्या मंत्र्याची आम्हाला कमतरता भासली. त्यांनी लिहलेले पुस्तक सर्व लोकप्रतिनिधींची विधी मंडळाचे कामकाज समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. याबरोबरच त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना भावी राजकीय भवितव्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
भाजपात येणाऱ्यांची नावे मलाही वर्तमानपत्रात कळतात - मुख्यमंत्री
लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये होत असलेल्या इनकमिंगबाबत मुख्यमंत्रीही आश्चर्यचकित झाले आहेत. पुस्तक प्रकाशनात बोलताना फडणवीस यांनी, हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हेच समजत नाही. भाजपात येणाऱ्यांची नावे मलाही वर्तमानपत्रात कळतात, असे विधान केले. त्यांच्या या विधानावर मात्र सभागृहात एकच हशा पिकला.
हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा सभागृहात आमदार म्हणून यावे - अशोक चव्हाण
या पुस्तक सोहळ्याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा सभागृहात आमदार म्हणून यावे, असी मनिषा व्यक्त केली. हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदार संघातून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभूत झाले. या जागेवर आता राष्ट्रवादीचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली असली तरी इंदापूरची जागा कुणाकडे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात थेट या जागेची मागणी केली नाही. मात्र ही जागा पुन्हा काँग्रेस कडे यावी असे सूतोवाच करत, हर्षवर्धन यांनी आमदार होऊन सभागृहात यावे असे म्हटले .
मुख्यमंत्री हवे ते करतात, मात्र दिलखुलास हसतात - सुशीलकुमार शिंदे
राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगले आहेत. राज्यातही अनेक घडामोडी सध्या घडत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांच्या जे मनात आहे तेच ते करतात, मात्र नंतर दिलखुलास हसतात. अशी कोपरखळी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मारताच मुख्यमंत्र्यांनीही त्याला दिलखुलासपणे हसून दाद दिली.