मुंबई - मंत्रालयातील चकचकीत अशा या वरांड्यामध्ये हातात एक कागदी पिशवी घेऊन स्वतःचा तोल सावरत चालणारी ही दिव्यांग व्यक्ती अधूनमधून मंत्रालयात दिसते. मंत्रालयात दररोज हजारो लोक हजेरी लावत असतात. आपल्या समस्या आणि अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी अथवा अडकलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी लोकांची हजेरी असते. मात्र दिव्यांग असलेल्या हा व्यक्ती मंत्रालयात काही मागण्यासाठी नाही तर काहीतरी देण्यासाठी नेहमी येत असतो. ( handicap doing Help in CM Fund at mantralaya )
टेलिफोन बूथ चालवणारा दाता - अंधेरी इर्ला नाला येथे दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले टेलिफोन बूथ चालवून हेमंत मिश्रा ( Hemant Mishra Help To CM Fund ) आपला उदरनिर्वाह चालवतात. दिव्यांग असलेल्या हेमंत मिश्राचे हिंदी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोबाईल फोनच्या या युगात टेलिफोन बूथचा वापर अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे हेमंत मिश्राला महिन्याकाठी केवळ साडेतीन ते चार हजार रुपये मिळतात. या पैशांमध्ये कसातरी आपला चरितार्थ ते चालवितात. हेमंत अविवाहित असून ते आपल्या आई-वडिलांसोबत अंधेरी येथे राहतात.
समाजाचे ऋण फेडण्याची प्रबळ इच्छा - हेमंत मिश्रा यांचे म्हणणे आहे की, आपण जे कमवतो त्यातील दोन पैसे गरजू रुग्णांसाठी खर्च केले पाहिजेत. गरजूंना उपचार मिळावेत आणि त्यासाठी आपला हातभार लागावा म्हणून मी महिन्यातून दोन वेळा मुख्यमंत्री सहायता निधीला शंभर रुपये देणगी देत असतो. त्यासाठी मी स्वतः दोन वेळा अंधेरीहून मंत्रालयात येतो.
लोकांनीही मदत करावी - आपण मुख्यमंत्री सहायता निधीला देत असलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. याची आपल्याला जाणीव आहे. मात्र आपल्या स्वकष्टातून थोडी रक्कम जर प्रत्येकाने मुख्यमंत्री सहायता निधीला दिली तर गरीब आणि गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळायला मदत होईल आणि याच समाधान आपल्याला आयुष्यभर लावेल त्यामुळे सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली पाहिजे असे आवाहनही हेमंत करतो. आपल्या स्वतःच्या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतही हेमंत स्वतः येऊन मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी देत असतो हेमंत चे हे कार्य मोठ मोठ्या धनिकांना आणि केवळ फायदा मिळवण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.