मुंबई - राज्यात मागील कित्येक वर्षे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री-उत्पादनावर बंदी आहे. मात्र तरीही छुप्या पद्धतीने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कशी जोरात सुरू आहे, हे पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)च्या कारवाईतून समोर आले आहे. काल, सोमवारी एफडीएने अँटॉप हिल येथे छापा टाकत तब्बल 12 लाख 91 हजार 954 रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तर याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
18 नमुने ताब्यात
एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काल अँटॉप हिल येथे छापा टाकला. शेख मिश्री रोड येथील ट्रान्झिट कॅम्पमधील रूम नंबर 001, 8 बी या घरावर छापा टाकला. यावेळी रोहन तोडणकर या व्यक्तीकडे गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारीचा मोठा साठा आढळला. या साठा एफडीएने जप्त केला आहे. तर याचे 18 नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी दिली आहे. तर मुंबईत कुठेही कुणी प्रतिबंधित पदार्थांची विक्री करताना आढळले वा तशी काही माहिती असल्यास त्वरित एफडीएशी संपर्क साधला असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रोहन तोडणकरविरोधात गुन्हा दाखल
ज्या घरात छापा टाकण्यात आला, त्या खोलीत रोहन तोडणकर नावाची व्यक्ती राहत होती. याच रोहनकडे 12 लाख 91 हजार 954 रुपयांचा साठा आढळला. त्यानुसार प्रतिबंधित पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साठ्यात विमल पानमसाला, गोवा 1000, एमजीआर 2000, नजर 90000 गुटखा, रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला आदीचा समावेश आहे.