मुंबई - 6 डिसेंबर...भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीम अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. पण यंदा मात्र या भीम अनुयायांना चैत्यभूमीला येता येणार नाही. त्यामुळे अभिवादन करता येणार नाही. त्यांची वाट यंदा 'कॊरोना'ने अडवली आहे. त्यामुळे या अनुयायांना याची मोठी खंत वाटत आहे. पण प्रत्यक्षात त्यांना येऊन बाबासाहेबांना अभिवादन करता येणार नसले तरी भीम अनुयायांना एका अनोख्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करता येणार आहे. हे माध्यम म्हणजे पत्र. पत्राच्या माध्यमातून अभिवादन संदेश लिहीत पत्र चैत्यभूमीला पाठवत बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संधी अनुयायांसाठी उपलब्ध झाली आहे. तर या उपक्रमाला अनुयायांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
दरवर्षी असते चैत्यभूमीवर लाखोंची गर्दी
चैत्यभूमीवर दरवर्षी देशभरातून लाखो भीम अनुयायी येतात. तेव्हा त्यांची राहण्याची-खाण्या-पिण्याची सोय करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई महानगर पालिका एक महिना आधीच तयारीला लागते. शिवाजी पार्कमध्ये मंडप टाकले जातात. त्यांना सर्व सुविधा तिथे उपलब्ध करून दिल्या जातात. महत्वाचे म्हणजे 1 डिसेंबरपासून च अनुयायी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे 8 डिसेंबर पर्यंत येथे सर्व व्यवस्था पालिकेकडून पुरवली जाते. त्याचवेळी महापरिनिर्वाण दिन आणि पुस्तक विक्री-खरेदी हे समीकरण असून यादरम्यान कोट्यवधीची पुस्तक विक्री होते. त्यामुळे पालिकेकडून पुस्तक आणि इतर साहित्य विक्रीसाठी स्टॉल ही टाकून दिले जातात.
5 डिसेंबरपासून चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात गर्दी होते. पण यंदा मात्र पहिल्यांदा 'ऊर्जाभूमी' अर्थात चैत्यभूमी परिसरात शुकशुकाट असण्याची शक्यता आहे. कॊरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चैत्यभूमीवर येण्यास निर्बंध घातले आहेत. घरीच राहून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेत्यांनी, संघटनांनी केले आहे. तर कॊरोनाचे संकट आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अनुयायांनी ही या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
...एक पत्र 'बाबा'ला
मोबाईल आला, मग त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅप आले. जग जवळ आले, हजारो मैल दूर असलो तरी जवळ असल्याप्रमाणे एकमेकांशी सवांद आता साधता येत आहे. त्यामुळेच कधी काळी संवादाचे आणि निरोपाचे एकमेव साधन होते ते म्हणजे पत्र. पत्रातून संवाद साधण्यात जे सुख, जिव्हाळा वाटत होता तो आजच्या मोबाईल, फेसबुक मध्ये नाही. तेव्हा बाबासाहेबांजवळ यंदा आपल्याला पोहचता येणार नसले तरी त्यांना वेगळ्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठी पत्र हेच योग्य माध्यम असू शकते असे विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांना वाटले. यातूनच त्यांनी यंदा बाबासाहेबाना पत्रातून अभिवादन करण्याची संकल्पना पुढे आणली. ही संकल्पना सोशल मीडियातून अनुयायांपर्यंत पोहचवली.
चैत्यभूमीच्या पत्त्यावर पोस्टकार्ड येऊ लागली
कांबळे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आता पोस्ट कार्ड येण्यास सुरुवात झाली आहे. मागील पाच-सहा दिवसांत अंदाजे 6 हजार पत्र आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर आता हे सर्व पत्र जमा करत 6 डिसेंबरला चैत्यभूमीत ठरवण्यात येणार आहेत. दरवर्षी चैत्यभूमीत हार-फुलं आणि मेणबत्त्याचा ढीग लागतो. पण यंदा मात्र या ठिकाणी पोस्टकार्ड असणार आहेत हे विशेष.
मुंबईच्या प्रथम नागरिकांकडूनही बाबासाहेबांना पत्ररूपी अभिवादन
विविध ठिकाणांहुन हजारो पत्र चैत्यभूमीवर येऊ लागली आहेत. तर या पत्रात एक पत्र हे मुंबईच्या प्रथम नागरिक अर्थात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे आहे. समता-न्याय-बंधुता या त्रयीवर आधारित जातीविरहीत, वर्गविरहित आणि लोकशाही प्रणाली, नवसमाजाची निर्मिती हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ध्यास होता. त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा ध्यास होता. अशा या महामानवाला अभिवादन अशा शब्दात महापौरांनी पत्ररूपाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे.
हेही वाचा - नागपुरात कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीत कैद
हेही वाचा - देशात 4 लाख 46 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; तर रिकव्हरी रेट 93.81 टक्के