मुंबई - बाळासाहेब आपल्यातून गेले असे आजही कोणाला वाटत नाही. आजही ते आपल्यात आहेत असेच वाटत असते, अशा आठवणी जागवत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या नवव्या स्मृतीदिना निमित्त (Balasaheb Thackeray Death Aniversary)अभिवादन केले. यावेळी बाळासाहेबांचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने ते बाळासाहेबांचे ऑनलाइन दर्शन घेऊ शकतात, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.
स्मृती उजळण्याचा प्रयत्न
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Aniversary) यांच्या बुधवार (आज 17 नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. या स्मृतीदिना पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, हा खूपच दुःखदायक दिवस असतो. जस जशी वर्ष जातात तसे प्रत्येक जण सावरत असतो. बाळासाहेब गेले असे कोणालाही वाटत नाही. आजही ते आहेत असेच वाटत असते. म्हणून प्रत्येक शिवसैनिकाचे म्हणणे असते बाळासाहेब परत या परत या. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक आजही तसाच आहे. त्यामुळे शिवसेनेचे काम तसेच सुरू आहे, असे महापौरांनी सांगितले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला कोणत्याही प्रकारचा पक्ष भेदाभेद नसतो. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं ते सर्व येऊन याठिकाणी येऊन नतमस्तक होत असतात. त्यांची स्मृती उजळण्याचा प्रयत्न करतात, असे महापौर म्हणाल्या.
'मुख्यमंत्री ऑनलाइन दर्शन घेण्याची शक्यता'
मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कालच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना आराम करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्यास ते नक्की शक्ती स्थळावर येतील मात्र येणे शक्य न झाल्यास ते लाइव्ह दर्शन घेऊ शकतात. तसेच शिवसैनिकांना ऑनलाइन संबोधन करायचे असल्यास ते करूही शकतात, असेही महापौरांनी सांगितले.
हेही वाचा -ड्रग्स ते दंगल! वाचा राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका, एका क्लिकवर...