मुंबई - संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील (Sanyukta Maharashtra Movement) हुतात्म्यांच्या स्मृतींदिनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हुतात्मांना अभिवादन केले. आधुनिक महाराष्ट्र ज्यांच्या असीम त्याग, समर्पणातून उभा राहिला आहे, त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम. भाषिक स्वातंत्र्य आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी या महाराष्ट्र सुपुत्रांनी प्राणपणाने दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
'हेच वीर महाराष्ट्रपुत्रांना खरे अभिवादन' -
पुढे बोलताना, हा लढा अजूनही संपलेला नाही. जग आणि पुढच्या पिढीपर्यंत या सीमा लढ्याच्या संघर्षाची धग पोहचविणे, तिची धार कायम ठेवणे हेच या वीर महाराष्ट्रपुत्रांना खरे अभिवादन आहे. त्यासाठी मराठीची वज्रमूठ करूया, असेही ते म्हणाले. तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिना’निमित्त भावपूर्ण वंदन करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या.
'संयुक्त महाराष्ट्राचा लढा गौरवशाली' -
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेनं एकजुटीनं, प्राणपणानं लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सर्व वीरांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण. हुतात्मा वीरांना विनम्र अभिवादन करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - माफी मागून चालणार नाही, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत करा - संजय राऊत