मुंबई - कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडसाठी नियोजित असलेल्या जागेवर सायंकाळच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर एका तासात नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या जागेवर कोणतीही बांधकामे नसल्याने कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
- कारशेडसाठी राखीव जागेवर आग -
कांजूरमार्ग येथे मेट्रोच्या कारशेडसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेवरील गवताला काल (सोमवारी) आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व पालिका वार्ड कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. सायंकाळी ५.२३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. या आगीत १ हजार बाय १ हजार चौरस फूट जागेतील गवत जळून खाक झाले. ही आग का व कशी काय लागली, याबाबत चौकशी केली जाणार आहे. ही आग लागली की लावली, याबाबतची सत्य माहिती चौकशीतून समोर येणार आहे. मात्र या आगीच्या घटनेवरून महाविकास आघाडी व भाजपा यांच्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- कारशेडसाठी राखीव जागा
मुंबईत ट्रॅफिकवर उपाय म्हणून मेट्रो प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत मुंबईत मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना आरे कॉलनीतील जागा नक्की केली होती. मात्र या जागेतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेने आरेमधील जागेला विरोध केला होता. त्यावेळी भाजपाने त्याला दाद दिली नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करताच कांजूरमार्ग येथील भूखंड मेट्रो कारशेडसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने सरकारने पावले उचलली. मात्र प्रकरण कोर्टात गेल्याने अधांतरी राहिले होते.
हेही वाचा - Fire in Mumbai : मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात आग; धुराने वातावरण झाले अंधारमय, पाहा VIDEO