मुंबई - कॉंग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी राज्यमंत्री व मुंबईचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.
एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेचे तसेच विधानसभेचे सदस्य म्हणून मुंबईच्या आणि विशेषतः धारावीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. मितभाषी असलेले एकनाथ गायकवाड नेहमी जनसामान्यांमध्ये राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला आहे. दिवंगत गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कन्या तसेच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना व त्यांच्या इतर कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
'काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक हरपला'
दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक हरपला असून, आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली
कधीही न भरून निघणारी हानी
गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या एकनाथ गायकवाड यांना गोरगरीब जनतेच्या समस्यांची जाण होती. ते सतत लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत होते. अत्यंत दांडगा जनसंपर्क असणारे गायकवाड तीन वेळा विधानसभेवर आणि दोन वेळा लोकसभेत निवडून गेले. राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार अशी विविध खाती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. खासदार म्हणून त्यांनी जनतेच्या हिताचे प्रश्न लोकसभेत मांडले. पक्ष संघटनेतही त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. अत्यंत कठीण काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडून त्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवला. एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.