मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज स्नेह भोजनासाठी 'मातोश्री'वर भेटणार आहेत. या सदिच्छा भेटीदरम्यान कौटुंबिक स्नेह भोजन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेले दोन महिने राज्यातील सत्ताकारणात कोश्यारी यांचे नाव कायम चर्चेत राहिले. देवेंद्र फडणवीस यांना लगबगीने दिलेल्या शपथीसाठी कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर राज्यपाल आणि शिवसेनेतील संबंध चांगले नसल्याचं समोर आलं. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळीही राज्यपालांनी अनेक मंत्री शपथ घेत असताना नियमांवर बोट ठेवत आक्षेप घेतला होता. काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांना शपथ परत घ्यायला लावली होती. त्यामुळे पुढील काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
आज अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्नेह भोजनासाठी थेट मातोश्रीवर दाखल झालेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात स्थिर सरकार चालवण्यासाठी राज्यपाल आणि सरकार यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आजच्या स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.