मुंबई - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ एक दिवसाचे होते. या अधिवेशनामुळे महाराष्ट्राच्या जनतेची निराशा झाली आहे. कुठलीही घोषणा या अधिवेशनात झाली नाही. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली नाहीत. शेतकऱ्यांच्या तोंडाला या सरकारने पाने पुसली आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकार कन्फ्युज आहे. जे सरकारच्या विरुद्ध मोर्चे काढत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री काही चार चांगल्या घोषणा करतील असे वाटत होते. मात्र त्यांनी केवळ राजकीय टोलवा-टोलवी केली. महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल बोलले की तो देशद्रोह होतो, मग देशाच्या पोलिसांबद्दल कुणी बोलले तर काय होते? शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून ते भाषण करू शकतात पण संविधानिक पदावर असताना असे भाषण ते करू शकत नाहीत. तुम्ही सीबीआय आणि ईडीवर दबाव तयार करत आहात का? असा देखील सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
पुढे फडणवीस म्हणाले की, अर्णब आणि कंगना बद्दल जो निर्णय दिला तो मी वाचून दाखवला तो याना इतका झोंबला की यांनी थेट ईडी आणि सीबीआयवर बोट ठेवले. मेट्रो कारशेडला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असताना, ते मेट्रो कारशेड कांजूरमार्गला घेऊन जाऊन मुंबईचे प्रकल्प कोण अडवतो? असे प्रश्न निर्माण होत आहेत. 2021साली मेट्रो मुंबईकरांसाठी यावी असे आम्ही म्हटले होते.
..हे अघोषित आणीबाणीचे द्योतक -
फडणवीस म्हणाले, चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली भाजपला दणदणीत विजय मिळाला त्यामुळे एखादी निवडणूक हरल्यानंतर अशी टीका करणे योग्य नाही, ते बेशिस्तपणा करत आहेत. त्यांच्याशी मी आणि चंद्रकांत पाटील बोलू, कोळी समाजाच्या आंदोलनात गेलो तर त्या महिलांना रात्री 11 वाजता पोलिसांनी नोटिसा पाठवल्याचे समजले, हे अघोषित आणीबाणीचे द्योतक आहे.
आज आंदोलन करू नका, सरकार विरुद्ध समाज माध्यमात बोलू नका, असे सांगितले जात आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगनाला कायद्याने शिक्षा द्या. सूडबुद्धी लोकशाहीत चालत नाही. हे तानाशाहीमध्ये चालतं.
तसेच ही तानाशाही या देशात चालत नाही. पाकिस्तानमध्ये चालते.
शिवसेनेला हिंदुत्व सांगावे लागत आहे -
मुख्यमंत्र्यांना सांगावं लागत की शिवसेना हिंदुत्ववादी आहे. सावरकरांच्या बाबत शिवसेनेने बोटचेपी भूमिका घेतली. तसेच आज त्यांना जुन्या मंदिराचे सर्वधन करावे लागते आणि त्यांना हिंदुत्व सांगावं लागत आहे. त्यांना आपले हिंदुत्व सांगण्यासाठी योजना आणावी लागत आहे.