मुंबई : आर्यन खान प्रकरण घडवून आणल्याचा धक्कादायक दावा विजय पगारे नामक कथित प्रत्यक्षदर्शीने केला आहे. या प्रकरणी कारवाई झाली त्या दिवशी विजय पगारे यांनी मनीष भानुशाली यांना एनसीबी कार्यालयात गाडीतून सोडल्याचे पगारे यांचे म्हणणे आहे. तेव्हा भानुशाली यांचे फोनवरील संभाषण ऐकले होते. यात कथितरित्या पैशांच्या देवाण-घेवाणीसंबंधी बोलणे झाल्याचे पगारे यांनी म्हटले आहे.
कारवाई झाली त्या दिवशी मनीष भानुशाली यांना एनसीबी कार्यालयात सोडले होते तेव्हा भानुशाली हे फोनवर बोलत होते. त्यात 25 कोटीची डील 18 कोटीत फायनल झाली. पन्नास लाख दिले असे ते बोलत होते. त्यानंतर एनसीबी कार्यालयाजवळ आल्यावर मीडियाची मोठी गर्दी मला दिसली. तेव्हा मी विचारणा केली असता आर्यन खानला अटक झाल्याचे मला समजले. तेव्हाच मला या प्रकरणाविषयी शंका वाटली होती. यानंतर मी शिंदे साहेबांना भेटून आर्यन खानला फसवल्याचे सांगितले असेही पगारे म्हणाले.
सुनील पाटीलने माझे आणि माझ्या मित्राचे मिळून 43 लाख रुपये रेल्वेत कंत्राट मिळवून देण्यासाठी घेतले आहे. तीन वर्षे झाले तरी त्याने पैसे दिले नाही. त्यामुळे मागच्या 6 महिन्यांपासून मी सतत सुनील पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ही कारवाई ठरवून केलेली कारवाई आहे. किरण गोसावीने ५० लाख रुपये घेतले होते. संपूर्ण डिल मधील काही रक्कम अधिकारी यांना जाणार होती. एका सेल्फीमुळे सगळे पैसे गेले असं सुनील पाटील मला स्वतः बोलल्याचा खळबळजनक दावा विजय पगारे यांनी केला आहे.
हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसांनी दिवसभर किरण गोसावी आणि मनीष भानुशाली सतत टीव्हीवर दिसत होते. ४ तारखेला माझं बोलणं सुनील पाटील सोबत झालं. त्याने सांगितलं की, किरण गोसावीचा एक सेल्फी आपल्याला १८ कोटी रुपयांना पडला आहे. किरण गोसावीमुळं हातात आलेला सर्व पैसा परत गेला. मला लक्षात आलं आर्यन खानला फसवलं जात आहे. म्हणून मी लगेचच माझ्या एका मित्राला घेऊन किल्ला कोर्टात आलो. तिथं आर्यन खानला आणण्यात आलं होतं. मी सतीश माने शिंदे यांना भेटून आर्यन खानला फसवलं आहे असं सांगितलं परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही असेही पगारे यांनी म्हटले.