मुंबई - एसटीला शासकीय सेवेत विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या नऊ दिवसांमध्ये अनेक वेळा बैठका, चर्चांचे सत्र होऊनही अद्याप एसटी कर्मचार्यांच्या संपाचा तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (sadabhau khot) हे सातत्याने करत आहेत. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (ST Employees Strike) गंभीर नसून याबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करून लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी या संपाबाबत सरकारी पक्षाची चर्चा करण्याचा आश्वासन राज्यपालांकडून देण्यात आले.
राज्य सरकारचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न -
राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्याऐवजी राज्य सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत किती गंभीर आहे. याचा आढावा राज्यपालांनी घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना केली असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच राज्य सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा इशारा पुन्हा एकदा पडळकर यांनी दिला आहे.
'समितीवर विश्वास नाही' -
राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चेचा केवळ नाटक करत असून, संप मोडून काढण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. हा संप एसटी कर्मचाऱ्यांचा असून या संपाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारने या संपाला राजकीय वळून देऊ नये, अशी विनंती यांनी केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीवर आमचा विश्वास नसल्याचे यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितले. एसटी कर्मचारी आता आत्महत्या करू लागला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे राज्य सरकारने तत्काळ लक्ष द्यावे, अशी विनंती ही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
'कामगारांच्या आत्महत्यांबाबत राज्यपालांनी रेकॉर्ड मागवावे'-
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यापासून अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केले आहेत. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर राज्यपाल यांनी रेकॉर्ड मागवावे, अशी विनंती ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपालांकडे केली. तसेच राज्यात एसटीने प्रवास करणारे प्रवाशांमध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणे आदिवासी आणि विद्यार्थी प्रवास करत असतात. या संपामुळे त्या वर्गाची हेळसांड सुरू असून लवकरात लवकर यावर तोडगा निघणे गरजेचे असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपालांना सांगितले.
हेही वाचा - Sharad Pawar Vidarbha Visit : अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत मोजावी लागेल - शरद पवार