पणजी - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसीन या केंद्र सरकारच्या संस्थेने काही राज्यांपुढे 'कॅनाबीज' (गांजा)ची लागवड औषधी वनस्पती म्हणून करता येईल का?, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरून गोव्यात वादळ उठले आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की सदर वनस्पती औषधी म्हणून निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच तो पुढे नेण्यासही तयार नाही.
खात्यांतर्गत चर्चा
प्रस्तावित गांजा लागवड प्रकल्पावरून काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, शिवसेना यासह सर्वच विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले, की एखादा प्रस्ताव राज्य सरकारकडे आल्यानंतर तो विविध खात्यांकडे अभ्यासण्यासाठी जात असतो. असाच कॅनाबीजची औषधी वनस्पती म्हणून लागवड करणे शक्य आहे का?, असा प्रस्ताव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसीन या केंद्र सरकारच्या संस्थेकडून आलेला आहे. त्याची औषधी वनस्पती म्हणून कसा उपयोग होईल, एकाच ठिकाणी उत्पादन घेणे शक्य आहे काय याची खात्यांतर्गत चर्चा आहे. परंतु, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवाय तो पुढे नेण्यास इच्छुक नाही. मात्र, काही राज्यांनी औषध उद्योग म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, या जानेवारी महिन्यात गोवा विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. त्यावेळी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.