मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढला असताना आता तिसरी लाट येणार आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे. लहान मुलांना सर्वाधिक बाधा यावेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या विभागात मुलांचे वॉर्ड तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदारांना दिल्या.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. दरम्यान, येणाऱ्या तिसऱ्या लाटेबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी, जनतेला अशा संकटात सर्वाधिक मदत करावी, असे आवाहन केले.
राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे रुग्ण संख्याही वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य शासन कठोर उपाय योजना राबवत आहे. शिवाय, मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला असून ऑक्सिजन प्लांटही उभारले जात आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याचा इशारा टास्क फोर्सने दिला आहे. लहान मुले संसर्गित होण्याची मोठी शक्यता आहे. राज्यात आतापासूनच आपल्या विभागात लहान मुलांचे वॉर्ड तयार करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांना दिल्या आहेत. तसेच कोरोना संकटात राज्यातील जनतेला जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी खासदारांना केल्याचे समजते.