मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्याला प्रतिसाद देत गणेशोत्सव मंडळांनी परवानगी आणि उत्सवाची तयारी सुरू केली आहे. असे असतानाच आता पालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील के पश्चिम विभागात "प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये एक सार्वजनिक गणपती" अशी संकल्पना राबवावी असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. त्याला नगरसेवक आणि गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला असून, पालिकेला हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टिका केली जात आहे. तर एकाच ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल, अशी भीती नगरसेवक आणि गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत गेले चार महिने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहे. यामुळे राज्य सरकारने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याला मुंबईमधील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी प्रतिसाद देत यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे मान्य केले आहे. गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या परवानग्या देण्यासाठी मुंबई महापालिकेने ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरूवात केली आहे. मंडळांनी आपल्या बाप्पाच्या मुर्ती बुकिंग केल्या आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहात असताना पालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी एक पत्रक काढून 'एका नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये एक सार्वजनिक गणपती' अशी संकल्पना राबवावी असे आवाहन केले आहे. यंदा गणेश मुर्ती चार फुटापेक्षा लहान असल्याने त्या कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात. विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये, म्हणून इमारतींच्या खाली मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे, असे मोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. अंधेरी पश्चिमेला 13 नगरसेवक असून 13 सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरे करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त मोटे यांनी केले आहे.
गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार होईल -
सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी पत्रक काढून एक प्रभाग एक सार्वजनिक गणेशोत्सव केलेल्या आवाहनाला नगरसेवक आणि गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात आठ ते दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतात. या मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. मुर्ती बुकिंगही केल्या आहेत. परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत. एका नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये एकच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना आणि नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे होते. प्रभागातील सर्व मंडळ एकाच मंडळाच्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यास तयार होणार नाहीत. असा एक गणेशोत्सव साजरा केल्यास त्या ठिकाणी विभागातील नागरिकांची आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होईल, त्यामुळे फिजिकल डिस्टनसिंगचा प्रश्न निर्माण होऊन, कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल असे शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी म्हटले आहे.
मंडळांचा विरोध -
आमचे सोनाक्षी गणेशोत्सव मंडळ गेले 40 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. आमच्या मंडळाला मुंबई महापालिकेचे तीन, लोकसत्ताचे आठ तर इतर पुरस्कारही मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. यावर्षी कोरोनमुळे आम्ही सुरक्षितता पाळून लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करणार आहोत. एका नगरसेवकाच्या प्रभागात पाच ते सहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असतात. सर्वानी आपल्या मुर्ती बुकिंग केल्या आहेत. मंडप बंधण्यासाठी ऑर्डर दिल्या आहेत. आता आवाहन करून हा खर्च वाया जाणार असल्याने कोणतेही मंडळ याक्षणी एक प्रभाग एक सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तयार होणार नाही. पालिकेने दोन ते तीन महिने आधीच आवाहन करायला हवे होते, असे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व सोनाक्षी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ बाळा आंबेरकर यांनी म्हटले आहे.