मुंबई - श्रावण सुरू होताच गणेशोत्सवाची लगबग सुरू होते. बाप्पाचे आगमन व्हायला वेळ असला तरी पूर्वतयारी सुरू झाली आहे. मूर्तीशाळेतही मूर्ती साकारण्याचे काम गतीने सुरू आहे. परळ भागातील राहुल घोणे यांच्या कार्यशाळेतील गणपतीच्या दोन मूर्ती सोमवारी मॉरिशसला पाठविण्यात आल्या. ग्राहक पसंतीनुसार बनविलेली गणपतीची मूर्ती कंटेनरमध्ये ठेवून बोटीतून मॉरिशसला रवाना करण्यात आली. मूर्ती तेथे पोहचायला 1 महिन्याचा वेळ लागणार आहे. या मूर्तीशाळेतून मॉरीशसला मूर्ती नेण्याचे हे दुसरे वर्ष आहे, असे राहुल आर्टचे राहुल घोणे यांनी सांगितले.
मॉरिशसला पाठविण्यात आलेल्या या मूर्ती ६ आणि ९ फुटी आहेत. गणपती मूर्ती बनविण्यास साधारणपणे जुलै महिन्यापासून प्रारंभ करण्यात येतो. या कारखान्यात 4 फुटांपासून ते 22 फुटापर्यंतच्या मूर्ती घडविण्याचे काम साधारणतः ९ ते १० कलाकार करतात. मात्र जागेचे भाव जास्त असल्याने यावेळी काम सुरू करण्यास थोडा उशीर झाला. बाप्पा परदेशात चालला हे पाहून खूप बरे वाटते. आपली संस्कृती तिथे रुजत हे बघून खूप आनंद होतो. तेथेही आपल्यासारखा नाचत आणि वाजत गाजत गणेशोत्सव साजरा केला जातो, असे घोणे म्हणाले.
काही वेळा बऱ्याचशा मूर्तीशाळेत गणपतीच्या मूर्ती उरतात. मात्र, आम्ही जेवढ्या मंडळांनी मागणी केली आहे, तेवढ्याच मूर्ती तयार करतो. त्यामुळे जास्त मूर्ती उरत नाहीत. अशा प्रकारे गणपतीची विटंबना होणार नाही, याची काळजी आम्ही घेत असतो, असेही घोणे म्हणाले.