मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेले वर्षभर लसीकरण सुरू आहे. आता पुन्हा रुग्णसंख्य वाढू लागल्याने केंद्र सरकारने उद्या १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, गंभीर आजार असलेले 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पालिका सज्ज असून उद्यापासून पालिका, सरकारी ३०२ आणि खासगी १४९ अशा एकूण ४५१ केंद्रांवर बूस्टर डोस दिला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत १९ हजार ४७४ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू तर ओमायक्रॉनचे ४० रुग्ण
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि कोविड - १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) तसेच, स्टँडिंग टेक्निकल सायन्टिफिक कमिटी (STSC) यांच्या निर्देशानुसार हे लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच, खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी (Online Registration) तसेच, थेट येवून नोंदणी (Onsite / Walk-in Registration) पद्धतीने ही सुविधा उपलब्ध असेल.
वयोवृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्याने लस -
कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, तसेच ६० वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, ते दिनांक १० जानेवारी २०२२ पासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असतील. ६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किवा दाखवण्याची आवश्यकता नाही. मात्र, अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.
सरकारी केंद्रांवर मोफत लस -
शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर सर्व पात्र नागरिकांना विनामुल्य प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येईल. मात्र, ज्या पात्र नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल, अशा नागरिकांचे केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किंमतीमध्येच लसीकरण केले जाईल. लसीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र, ओळखपत्र गरजेचे -
सर्व आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन अॅपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी 'नागरिक' अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रात थेट येवून ( ऑनसाइट / वॉक इन ) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र, ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या लाभार्थ्यांना खासगी केंद्रात लस घ्यावयाची असेल तर, त्यांनी शासकीय केंद्रावर येऊन प्रथम योग्य ती वर्गवारी नोंदवावी आणि नंतर खासगी केंद्रावर लस घेण्याची त्यांना मुभा असेल.
हेही वाचा - पंतप्रधानांना कळते ते भाजप नेत्यांना कळत नाही, सोमैया भरसटलेले - महापौर पेडणेकरांचा टोला