मुंबई - नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना पश्चिम रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूकीची घटना समोर आली आहे. चर्चगेटच्या एका हेड टीसीने ही घटना उघडकीस आणली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ क्रिडा अधिकाऱ्याला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकार?
खेळात उत्तम प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूला रेल्वेमध्ये भरती केले जाते. खेळातील दर्जेदार सुविधा लक्षात घेत नवोदित खेळाडूंचे रेल्वेत नोकरीला लागून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. मात्र खेळाडूंच्या या स्वप्नांचा गैरफायदा घेत बनावट नियुक्तीपत्र पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने खेळाडूंना दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. एक कबड्डीपटू आणि एक लाॅग टेनिस पटूला 'कमर्शियल कम तिकीट क्लार्क' या पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार हेड टिसीने उघडीस आणला आहे.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चर्चगेट येथील हेड टिसीच्या अख्यारित हे दोन खेळाडू नियुक्ती पत्र घेऊन आले होते. मात्र, हे पत्र हेड टिसीने पाहताच बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर संपूर्ण प्रकाराची चौकशी आणि माहिती काढून या प्रकरणाचा दुवा अखेरीस फसवणूक करणाऱ्या पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ क्रिडा अधिकाऱ्यापर्यंत पोहचला. त्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या अधिकाऱ्यांचे नाव अजय आपटे आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणातील आणखी चार आरोपींचा शोध सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक