मुंबई - स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपटटयाच्या दस्ताऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये, आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.
१ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत संपुर्ण राज्यासाठी देय मुद्रांक शुल्काचा दर ५ टक्क्यांवरुन ३ टक्के करण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ किंवा त्यापुर्वी मुद्रांक शुल्क भरावे व दस्तामधील पक्षकारांनी त्यावर स्वाक्षरी पुर्ण करावी; जेणेकरुन नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील चार महिन्यात पक्षकारांना आपला दस्त नोंदता येईल. शासनाने १ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत संपूर्ण राज्यासाठी मुद्रांक शुल्कात सुट देऊन देय ५ टक्के ऐवजी २ टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारणी लागू केली. त्याचप्रमाणे १ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्काचा दर ३ टक्के लागू राहणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता, या सवलतीचा लाभ घेण्याकरता दस्ताऐवज चार महिन्यांत भरता येतो. त्यामुळे मार्च २०२१ शेवटची तारीख असली तरी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर उदयराज चव्हाण यांनी केले आहे.