मुंबई - दादर परिसरातील चित्रा सिनेमा जवळच्या टिळक ब्रिजवर गुरुवारी बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कसून तपासणी केली. यावेळी ही बॅग स्वीगी कंपनीच्या कर्मचाऱ्याची असल्याचे उघड झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
वर्दळीच्या असलेल्या टिळक ब्रिजवर एका काळ्या रंगाची बेवारस बॅग पडून असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरुन माहिती मिळाली होती. त्यामुळे ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकासह स्थानिक पोलिसांनी तात्काळ येऊन तपासणी केली.
बॅगेत जेवणाच्या डिलीव्हरीच्या डब्यांसह, मोबाईल चार्जर आढळून आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सदरची ही बॅग फूड डिलीव्हरी करणाऱ्या स्वीगी या कंपनीची असून जेवणाचे डबे देणाऱ्या डिलीव्हरी बॉयचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे सकाळी 10.30 ते ११.३० या वेळेत टिळक ब्रिज परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली.