मुंबई : अतिशय शिस्तीचे आणि वचक असणाऱ्या पोलीस विभागाच्या काही पोलिसांना सोशल मीडियावर रिलचे वेड लागले आहे. काही पोलीस खाकी वर्दीत तर काही ऑन ड्युटी रील करताना इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आढळून येत आहेत. त्यामुळे खाकी वर्दीतील रिअल हिरो रीलच्या विळख्यात अडकून खाकीचा अपमान, अवमान करत असल्याचे मत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर ( Former police officer demand Director General of Police take action against Police reel video ) यांनी ईटीव्ही भारतशी व्यक्त केले आहे.
समाजमाध्यमांवर पोलिसांचे रील - खाकी वर्दी म्हणजे एक वचक आणि सन्मान आहे. कित्येक लोकं ही खाकी वर्दी अंगावर परिधान करण्याकरता पोलीस दलात भरती होताना दिसतात. मात्र, आजच्या अत्याधुनिक सोशल मीडियाच्या जगात बरीच लोकं घरातल्या व्यक्तींची संवाद करणं विसरली आहेत. तसंच काहीसे चित्र पोलीस दलात पाहायला मिळत आहे. पोलिसांवर लाखो लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. तेच पोलीस जर मोबाईलमध्ये व्यस्त राहिले तर समजविघातक गोष्टी सहज घडू शकतात. इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर अनेक पोलीस गाण्यावर आपले रील खाकी वर्दीत बनवत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे खाकी वर्दीचा वचक आणि सन्मान, आदर अबाधित राहील का ? असा प्रश्न निर्माण होत आहे, याबाबत माजी पोलीस अधिकरी सुधाकर सुराडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीस महासंचालकांकडून कारवाई मागणी - सुधाकर सुराडकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, सोशल मीडियावर पोलीस गणवेशात जर रील प्रसारित होत असतील तर तो थिल्लरपणा आहे. खाकीत पोलिसांनी शिस्तीत राहिले पाहिजे. खाकी वर्दीचा अपमान करू नये. पोलिसाने खाजगी आणि ऑन ड्युटी देखील आपले वर्तन शिस्तीचे ठेवले पाहिजे, असे माझे मत आहे. अलिकडेच राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पोलिसांना सार्वजनिक कार्यक्रमांना नाचण्यास मनाई आणली आहे.मला त्यांचा हा निर्णय योग्य वाटतो. या रील प्रकरणी देखील पोलीस महासंचालक रजनीश शेठ काहीतरी कठोर पावलं उचलतील अशी माझी मागणी आहे. याप्रकरणी ईटीव्ही भारतने राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.