मुंबई - गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. तर, एक वाहन चालकाचाही यात मृत्यू झाला आहे. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येऊ घातल्या आहेत. हा हल्ला म्हणजे महाराष्ट्रातील पुलवामा तर नाही ना? असा प्रश्न माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी उपस्थित केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला. यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले. तर, एका वाहन चालकाचाही मृत्यू यात झाला आहे.
महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना अशी नक्षली हल्ल्याची घडल्याने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिघ्र प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. त्यावेळी कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडवला.
या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी शंका व्यक्त केली आहे. इंप्रूव्हाईज एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आईडी) पुलावामा हल्ल्यात वापरले गेले, तेच या हल्ल्यात वापरले गेले असा दावाही वंजारी यांनी केला आहे.