कोल्हापूर- शिवकुमारच्या छळामुळे दीपाली चव्हाण सारख्या सहकारी मैत्रिणीला आम्ही गमावले आहे. त्याला जबाबदार उपवसंरक्षक विनोद शिवकुमारला बडतर्फ करा. त्याचबरोबर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना निलंबित करा, अशी मागणी कोल्हापूर वन विभागीय कर्मचाऱ्यांनी केली. राज्य सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा, अन्यथा ५ एप्रिलपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्हातील कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे. राज्यभरात संताप व्यक्त होत असून संशयित उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मृत्यूनंतरही दीपाली चव्हाण यांला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आरोपींना शिक्षेची मागणी करत राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. शिव कुमारला पाठीशी घालणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दीपाली चव्हाण यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत व शिवकुमारच्या निषेधार्थ आज कोल्हापूर वन विभागीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी श्रीनिवास रेड्डी आणि शिव कुमार मुर्दाबाद चे नारे लावत जोरदार घोषणाबाजी कर्मचाऱ्यांनी केली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यां श्रीनिवास रेड्डी आणि विनोद शिवकुमार यांना शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिवकुमारला बडतर्फ करावे तसेच रेड्डी यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केले. अन्यथा ५ एप्रिलपासून विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी कार्यालयांना टाळे ठोकून बेमुदत कामबंद संपावर जातील असा इशारा दिला आहे.
प्रमुख मागण्या -
विनोद शिवकुमारला सेवेतून बडतर्फ करावे. |
दीपाली चव्हाण खटला फास्ट टॅग कोर्टात चालवावा |
सरकारी वकील उज्वल निकम हे या खटल्याचे वकील असावेत |
या प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी करावा |